‘इस्रो’चा ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनाशी करार !

  • (इस्रो : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था)

  • शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून टीका, तर सामाजिक माध्यमांवरूनही प्रश्‍न उपस्थित ‘

भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्‍या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी ! – संपादक

नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्रो’) ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनाची भारतीय शाखा ‘ओप्पो इंडिया’शी करार केला आहे. यामुळे सर्वच स्तरावरून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतूनही या करारावर टीका होत आहे. या कराराला ‘मोठी चूक’ असे म्हटले जात आहे. या कराराविषयी ‘इस्रो’कडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली, तरी ओप्पोकडून माहिती देण्यात आली आहे. ओप्पोने म्हटले आहे, ‘आत्मनिर्भर भारता’च्या विचारांना साहाय्य करण्यासाठी ओप्पोने ‘इस्रो’शी करार केला आहे. या अंतर्गत ‘नाविक संदेश सेवे’चे संशोधन आणि विकास अधिक चांगले करण्यासाठी काम करण्यात येणार आहे.’

‘इस्रो’ने ‘नाविक सिस्टम’ विकसित केलेली कार्यप्रणाली आहे. याद्वारे संदेश पाठवले जातात. याचा विस्तार दीड सहस्र किलोमीटर अंतरापर्यंत आहे.

१. शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘यामुळे मी फारच आश्‍चर्यचकित झाले आहे. एकीकडे आम्ही सीमेवर चीनशी लढत असतांना, तसेच भारतीय बाजारातील चीनचे वर्चस्व दूर करण्याचा प्रयत्न करत असतांना भारताची एक सशक्त संघटना (इस्रो) राष्ट्रीय सुरक्षेविषयीच्या धोक्यांपासून अनभिज्ञ आहे.’

२. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा महंमद यांनीही ट्वीट करून म्हटले, ‘एकीकडे चीन अवैधरित्या आपल्या भूमीवर नियंत्रण मिळवत आहे,  तर दुसरीकडे ‘इस्रो’ चीनच्या भ्रमणभाष बनवणार्‍या ऑप्पो आस्थापनाशी करार करत आहे.’