कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा
कोल्हापूर – आपण करत असलेल्या नामजपादी साधनेसमवेत आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलनही अत्यावश्यक आहे. आपल्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास आपल्याला सातत्याने आनंदी रहाणे शक्य आहे. ही प्रक्रिया राबवल्याने स्वतःतील आंतरिक सौंदर्य वाढते, ज्याचा परिणाम बाहेरही दिसतो. सद्यस्थितीत धर्मावर विविध मार्गांनी संकटे येत आहेत. धर्म हाच राष्ट्राचा प्राण असल्याने धर्म वाचला, तर राष्ट्र वाचेल. राष्ट्र वाचले, तर समाज वाचेल. आपण समाजाचा घटक असल्याने समाज वाचला, तर आपण वाचू शकू. त्यामुळे व्यष्टी साधनेसमवेत समष्टी धर्मकार्यही करणे तितकेच आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्यात १५४ धर्मप्रेमी-जिज्ञासू सहभागी झाले होते.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी करून दिला. सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या साधिका सौ. दुर्गेशा लोखंडे यांनी केले, तर सत्संग सोहळ्याचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी सांगितला. सत्संगात अनेक जिज्ञासूंनी ते साधना करत असल्यापासून त्यांना ‘काय काय लाभ झाले, तसेच त्यांच्यात काय काय पालट झाले’, ते सांगितले.
जिज्ञासूंचे अभिप्राय१. जिजा पाटील – सत्संग ऐकून खूप चांगले वाटले. मन शांत झाले. २. श्री. पुष्पराज माने – सत्संगामुळे लहानपणापासून मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे, हे लक्षात आले. ३. शिल्पा पंढरपूरकर – सद्गुरूंनी आता बोट धरून नावेमध्ये बसवले असून ते भवसागरातून पैलतीराला नेणार आहेत, याची निश्चिती झाली. |