वेत्ये येथे गॅसवाहिनी टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या कामामुळे वाहनाला अपघात

सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील वेत्ये येथे गॅसवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याचे काम चालू आहे. हे काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्यामुळे याठिकाणी ५ डिसेंबरला दुपारी एका चारचाकी वाहनाला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. याची माहिती मिळाल्यानंतर वेत्ये गावचे उपसरपंच गुणाजी गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली अन् अपघातग्रस्तांना साहाय्य केले. त्यानंतर ग्रामस्थांनी गॅसवाहिनीचे चालू असलेले काम बंद पाडले.

‘वेत्ये येथे चर खोदण्याचे काम करत असतांना त्यातील माती, तसेच पाईप रस्त्याच्या बाजूला चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले आहेत’, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मातीवरून भरधाव वेगाने जाणारे वाहन घसरले आणि अपघात झाला. (विकासकामे करत असतांना ठेकेदार आस्थापनांना काही नियम आणि अटी घातलेल्या असतात कि नाही ? तसेच चालू असलेल्या कामांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाते का ? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात. ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असेल, तर ठेकेदारासह या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही कारवाई केली पाहिजे ! – संपादक)