म्यानमारच्या माजी प्रमुख आंग सांग स्यू की यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सैन्याने आंदोलनकर्त्यांना गाडीखाली चिरडले !

यांगून (म्यानमार) – म्यानमारच्या नेत्या तथा नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सांग स्यू की यांना एका स्थानिक न्यायालयाने ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. स्यू की यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, तसेच भावना भडकावणे, या गुन्ह्यांखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्यानमारमध्ये सैनिकी बंडानंतर स्यू की गेल्या १ फेब्रुवारीपासून कोठडीत आहेत. आता शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना निवडणूकही लढवता येणार नाही. स्यू की यांना पदावरून हटवत म्यानमारमध्ये सैन्याने सत्ता स्वतःच्या हातात घेतली आहे.

दुसरीकडे यांगूनमध्ये सरकारविरोधी आंदोलकांच्या शांततापूर्ण मोर्च्यामधील नागरिकांवर सैन्याने त्यांचे वाहन घातल्याने यात ३ जण ठार झाले. काही नागरिक गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले. या वेळी आंदोलनकर्त्यांवर गोळीबारही करण्यात आला. आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या २ पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे.