वीजचोरी केल्याप्रकरणी ३ कारखान्यांना ८४ लाख ८४ सहस्र रुपयांचे वीजदेयक आकारले !

वीजचोरी केलेल्यांना दंडासमवेत कठोर शिक्षा होणेही आवश्यक आहे ! – संपादक 

पुणे – वीजेच्या मीटरमध्ये पालट करून ३ कारखान्यांमधील २ लाख ९३ सहस्र २१६ युनिटची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकांनी उघडकीस आणली. चोरीच्या या प्रकरणांमध्ये वीजचोरी आणि दंड आकारणी मिळून ८४ लाख ८४ सहस्र रुपयांचे वीजदेयक महावितरणने दिले आहे. पुणे शहरातील खडीमशीन रस्त्यावरील ‘फायबर ग्लास अँड इक्विपमेंट’, भोसरी औद्योगिक क्षेत्रातील (एम्.आय.डी.सी.) ‘प्रिसिशन टेक्नॉलॉजी अँड हिट हीटर्स’ आणि खेड तालुक्यातील धानोरे येथील ‘आनंद वायर प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या तीनही कारखान्यांतील वीजचोरीप्रकरणी भारतीय विद्युत् कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये कारवाई चालू आहे. वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा आणि कार्यवाही विभागाचे कार्यकारी संचालक, भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, साहाय्यक सुरक्षा आणि कार्यवाही अधिकारी, वरिष्ठ तंत्रज्ञ आदींनी साहाय्य केले.