सौ. ज्योतिका रवींद्र अंबीलवादे यांना कर्करोगाच्या आजारपणात झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

अंबड (जालना) येथील सौ. ज्योतिका रवींद्र अंबीलवादे (वय ३२ वर्षे) यांना कर्करोगाच्या आजारपणात झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘कर्करोग ३ ग्रेडपर्यंत (तिसर्‍या स्तरापर्यंत) वाढला आहे’, हे कळल्यावर पुष्कळ दुःख होऊन श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सारखे स्मरण होऊ लागणे

‘एक वर्षापासून माझ्या स्तनामध्ये गाठ झाली होती. १५.८.२०१८ या दिवशी शस्त्रकर्म करून गाठ तपासली, तर कर्करोग (कॅन्सर) झाल्याचे लक्षात आले. २७.८.२०१८ या दिवशी शस्त्रकर्म करण्याचे निश्चित झाले. घरच्यांनी चार दिवस मला झालेला आजार माझ्यापासून लपवला होता. २३.८.२०१८ या दिवशी माझ्या आईने धीर करून माझे वैद्यकीय अहवाल मला दाखवले. त्यातून मला केवळ एवढेच समजले की, माझा कर्करोग ३ ‘ग्रेड’पर्यंत (तिसर्‍या स्तरापर्यंत) वाढला आहे. तेव्हा मला पुष्कळ दुःख झाले. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांचे सारखे स्मरण होत होते अन् त्यांच्या चरणांवर डोके ठेवून मी सारखी रडत होते. मला माझ्या डोळ्यांसमोर दोन मुले आणि यजमान दिसत होते अन् ‘काय करावे ?’, ते सुचत नव्हते. माझ्या डोळ्यांपुढे सारखी अंधारी येत होती आणि मला फार खचल्यासारखे वाटत होते.

सौ. ज्योतिका रवींद्र अंबीलवादे

२. मंदिरात गेल्यावर तीन घंटे प.पू. गुरुदेव, श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ आणि श्री भवानीमाता यांचे शरणागतभावाने स्मरण होऊन ते एकरूप झाल्यासारखे वाटणे

माझी आई आणि मामी यांनी मला सांगितले, ‘‘ईश्वराच्या चरणी शरण जा.’’ मामीची ‘स्वामी समर्थ’ यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या पोथीचे ११ वेळा वाचन करून मी तीर्थ प्राशन केले. संभाजीनगर येथे मंदिरात गेल्यावर जवळजवळ तीन घंटे प.पू. गुरुदेव, श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ आणि श्री भवानीमाता यांचे शरणागतभावाने स्मरण होत होते. मी कोणताही नामजप केला, तरी आरंभी ‘श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ’ हाच नामजप होत होता. त्या वेळी वरील सर्व देवता एकरूप झाल्यासारखे मला वाटत होते.

३. मंत्रोपचार करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

३ अ. मंत्रोपचार चालू असतांना ‘कुणीतरी हात खाली ओढत आहे, तर कुणी वर ओढत आहे’, असे वाटणे : गुरुवारी रात्री रुग्णालयात गेल्यावर ‘नामजप होत आहे’, असे वाटले. २४.८.२०१८ ते ४.९.२०१८ पर्यंत सतत मार्गदर्शनानुसार साधना अन् मंत्रोपचार चालू होते. माझे अंग डाव्या बाजूने जड पडले आणि अंधारी येऊ लागली. मंत्रोपचार करण्यासाठी घेतलेल्या पेल्यातील पाण्यात उजवा हात होता आणि तो पुष्कळ दुखत होता. त्या वेळी माझा हात ‘कुणीतरी खाली ओढत आहे, तर कुणीतरी वर ओढत आहे’, असे मला वाटत होते. कृतज्ञतेसाठी हात जोडण्यासाठी पेल्यातील पाण्यातून हात काढल्यावर ते थरथर कापत होते. मंत्रोपायांच्या वेळी प्रथमतः माझ्या डोळ्यांपुढे अंधार येत होता. मध्ये मध्ये प्रतिकृती दिसत होती आणि शरीर पूर्ण जड होऊन पुष्कळ घाम येत होता.

३ आ. मंत्रोपायांमुळे मनातील भीती दूर होऊन परिस्थितीला सामोरे जाण्याची सिद्धता होणे : मंत्र म्हणतांना ‘फट् स्वाहा’, असे म्हणतांना ‘कुणीतरी आजाराला फटकारत आहे’, असे वाटले आणि ‘महारुद्राय नमः ।’ म्हणतांना प्रत्येक नामजपाला कृतज्ञताभाव जाणवत होता. त्या वेळी ‘कुणीतरी तांडव करत आहे’, असे जाणवत होते आणि ‘महारुद्राय नमः ।’ असे म्हटल्यावर तांडव करणारे कुणापुढे तरी नतमस्तक होत होते. हळूहळू शरीर गार पडून हलके वाटत होते. वरील आध्यात्मिक उपाय सतत तीन दिवस चालू होते. त्यामध्ये अंग आणि पाठ दुखणे अन् घाम येणे चालूच होते. मंत्रोपायांमुळे मनातील भीती दूर झाली अन् ‘देव आपले प्रारब्ध फेडून घेत आहे’, अशी मनाची सिद्धता झाली.

४. शस्त्रकर्मासाठी जातांना भीती वाटू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे आणि ‘भूलतज्ञ हे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असा भाव ठेवणे

२७.८.२०१८ या दिवशी १२.१५ वाजता शस्त्रकर्माची सिद्धता चालू असतांना मला पुन्हा भीती वाटू लागली. त्या वेळी अशक्तपणा जाणवून अंग थरथर कापत होते. १२.१५ वाजता शस्त्रकर्मासाठी नेतांना माझे यजमान आणि सौ. आदिती ठाकूर या साधिका आत आल्या. त्यांनी मला मुद्रा करण्यास सांगितली; पण मला मुद्रा जमत नव्हती. ‘प.पू. गुरुदेव अन् श्रीकृष्ण’, असाच नामजप सारखा चालू होता. सौ. आदिती ठाकूर यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा ‘प.पू. गुरुदेवांनीच हात फिरवला’, असे वाटले आणि माझे मन स्थिर झाले. चाकांच्या आसंदीवर (‘व्हील चेअर’वर) बसवल्यावर आदितीताई म्हणाल्या, ‘‘ही प.पू. गुरुदेवांची आसंदी आहे.’’ त्यांनी मोठ्याने ‘प.पू. गुरुदेवांचा विजय असो’, असा जयघोष केला. मला शस्त्रकर्म कक्षाकडे नेत असतांना ‘प.पू. गुरुदेव, तुम्हीच चाकांची आसंदी मागून धरली होतीत आणि तुम्ही म्हणालात, ‘चला, चला आपल्याला लवकर प्रारब्ध फेडून संपवायचे आहे.’ आत गेल्यावर मी ‘भूलतज्ञ हे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असा भाव ठेवला.

५. शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडणे आणि झोपल्यावर शस्त्रकर्म झाले, त्या ठिकाणातून जोराने विजेसारखे काहीतरी ओढल्यासारखे वाटणे

शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले. शस्त्रकर्म चालू असतांना ‘आश्रमात राखी बांधण्याचा सोहळा चालू असून एक एक साधिका प.पू. गुरुदेवांना राखी बांधत आहे आणि त्या साधिकांच्या समवेत मीही आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. सकाळी ७.३० ते ८ या वेळी मी झोपले असतांना ज्या जागेवर माझे शस्त्रकर्म झाले, तिथून जोराने विजेसारखे काहीतरी ओढल्यासारखे झाले. मी जोराने ओरडले आणि मला जाग आली. जे काय होते, ते वरच्या दिशेने गेले. शेजारील रुग्ण आणि इतर सगळे माझ्याकडे पहात होते. मी पुन्हा झोपल्यावर ‘माझा त्रास निघून गेला’, असे मला वाटले आणि मला कृतज्ञता वाटली. हे लिहित असतांना माझा भाव जागृत होत आहे आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.

६. रुग्णालयात साधकांच्या माध्यमातून ‘प.पू. गुरुदेवच धीर देत आहेत’, असे वाटणे आणि शस्त्रकर्म पूर्ण होईपर्यंत एका साधिकेने नातेवाइकांकडून सामूहिक नामजप करवून घेणे

या सगळ्या घटनांनंतर वाटले की, गुरुदेव आपल्यासाठी किती करतात आणि आम्ही काही न करता आपल्यावर गुरुकृपा होतच रहाते. प.पू. गुरुदेवांनी मला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक कोणतीही अडचण येऊ दिली नाही. अडचण आली, तर लगेच मार्ग निघत होता. ‘आपले सर्व साधक एका परिवारातीलच आहेत’, ही जाणीव होत होती. रुग्णालयात ‘सगळ्या साधकांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच मला धीर देत आहेत’, असे जाणवत होते. शस्त्रकर्माच्या वेळी ते पूर्ण होईपर्यंत आदितीतार्ईंनी माझ्या नातेवाइकांकडून सामूहिक नामजप करवून घेतला.

७. प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून स्वतःच्या व्यष्टी-समष्टी साधनेची घडी बसवता येत नसल्याने खंत वाटणे

‘प.पू. गुरुदेवांचे माझ्याकडे लक्ष आहे’, असे विचार माझ्या मनात आले. गुरुदेव आपली किती काळजी घेतात आणि ते आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतात, तर केवळ ‘शरणागतभाव वाढवा !’ तेच मला अजूनपर्यंत जमले नाही, याची मला फार खंत वाटली. २ घंटे नामजप आणि स्वभावदोषांवर स्वयंसूचना या व्यतिरिक्त गुरूंनी काय मागितले आहे ? ‘व्यष्टी आणि समष्टी साधना यांची घडी मला बसवताच आली नाही’, याची माझ्या मनाला सारखी लाज वाटत होती.

८. भावसत्संग ऐकतांना पुष्कळ आनंद होऊन भावावस्था अनुभवणे

२.९.२०१८ च्या रात्री मी भावसत्संग ऐकला. त्या वेळी मला फारच आनंद झाला. सत्संग घेणार्‍या साधिका जसा भाव ठेवायला सांगायच्या, तसा भाव मी अनुभवत होते. आनंदाने भरलेले वृंदावन, त्यामधील गायींच्या गळ्यातील घंटा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अत्यंत मधुर असणारी मुरलीधराची मुरली ! त्या वेळी ‘ती मुरली सतत वाजत रहावी’, असे मला वाटत होते.

९. बासरीला पूर्णपणे पोखरल्यावरही बासरीचे मन आनंदी रहाते, त्याप्रमाणे शरिराचा कर्करोगग्रस्त भाग पोखरला असूनही मनात कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव असणे

एका सत्संगात सत्संग घेणारी साधिका ‘मुरलीधराची बासरी’, याविषयी सूत्र सांगत होती. ‘बांबूची बासरी कशी झाली ? तिला कशा प्रकारे कापण्यात, पूर्णपणे पोखरण्यात आले आणि नंतर तिला छिद्र पाडण्यात आले !’ एवढे त्रास होऊनही बासरीचे मन आनंदी होते. बासरीप्रमाणेच माझ्या शरिराचा नको असलेला भाग पोखरला. त्याचा मला काहीच त्रास झाला नाही. सतत कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जाणवत होता. ‘बासरीने सोसलेल्या त्रासांपुढे माझा त्रास अतिशय न्यून आहे’, याची मला जाणीव झाली. मला श्रीकृष्णाची मुरली व्हायचे आहे, श्रीकृष्णाचे मोरपीस व्हायचे आहे आणि श्रीकृष्णाच्या पादुका व्हायचे आहे. ‘श्रीकृष्णाच्या सत्संगातील बासरीचा आवाज आणि वृंदावनातील चैतन्य’ हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

गुरुमाऊलींनी मला ‘बासरीसारखे सतत आनंदी रहाण्याची शक्ती द्यावी आणि माझे प्रारब्ध लवकरात लवकर फेडून मोक्षाला न्यावे’, हीच श्रीगुरुचरणी प्रार्थना !’

– सौ. ज्योतिका रवींद्र अंबीलवादे, अंबड (जिल्हा जालना) (२७.८.२०१८)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक