रस्त्यात अपघाती मृत्यू पावणार्यांचे स्मरण ठेवण्यासाठी नोव्हेंबरमधील तिसरा रविवार हा ‘रस्ते अपघातातील मृतांचा स्मरणदिन’ म्हणून पाळण्यात येतो. ‘रस्त्यावर अपघात अल्प व्हावेत, तसेच अपघातात अल्प मृत्यू व्हावेत’, यांसाठी विविध उपक्रमांतून समाजप्रबोधन करण्यात येते. तरीही केवळ पुण्यामध्ये एका वर्षात १९९ जणांनी रस्त्यावरील अपघातात प्राण गमावले आहेत, तसेच गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात दळणवळण बंदी असतांनाही जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये ४८२ अपघातांची नोंद झाली होती. यंदा ३१ ऑक्टोंबरपर्यंत ५८१ अपघातांची नोंद आढळून आली. अशी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. याचाच अर्थ अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
जगभरातील एकूण वाहन संख्येच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने आहेत; परंतु रस्ते अपघातात ११ टक्के मृत्यू होतात; म्हणजेच भारतात प्रतिघंट्याला ५३ रस्ते अपघात होतात आणि प्रति ४ मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. याचाच अर्थ भारतात २ लाख ३५ सहस्र ९२९ अपघात होतात. त्यामध्ये ९२ सहस्र ८३७ व्यक्ती मृत्यू पावतात. त्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील मृतांचे प्रमाण ७० प्रतिशत आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गावर ३५ टक्के, तर राज्य महामार्गावर २५ टक्के अपघात झाले आहेत. हे प्रमाण जगभर थैमान घालणार्या कोरोनाच्या संसर्गापेक्षा अधिक आहे. या रस्ते अपघातातील हानीमुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (‘जीडीपी’मध्ये) प्रतिवर्ष ३.१४ टक्क्याने घट होते, तर वैद्यकीय व्यय, मृत्यू किंवा घायाळ झाल्याने बुडणारे उत्पन्न, वाहनांची हानी आणि अन्य प्रशासकीय व्यय लक्षात घेता प्रत्येक मृत्यूमागे लाखो रुपयांची हानी होत आहे. ही हानी टाळण्यासाठी अपघात अल्प होण्यासाठीचे प्रयत्न युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे. यासाठी जनता आणि प्रशासन या दोघांचे दायित्व तेवढेच आहे.
अतिवेगाने वाहन चालवणे, वाहन चालवतांना सुरक्षित अंतर न ठेवणे, भ्रमणभाषवर बोलत वाहन चालवणे, ‘ओव्हरटेक’ करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे किंवा माल भरणे आदी अनेक कारणे अपघातांमागे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वाहनचालकांमध्ये जागरूकता वाढवणे, रस्ते सुरक्षा उपायांची कठोर कार्यवाही करणे, रस्ता सुरक्षेकडे सामाजिक दायित्व म्हणून बघणे आवश्यक आहे, तसेच सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. सरकार आणि नागरिक यांच्या सहकार्यातून हे शक्य होईल !
– श्री. अमोल चोथे, पुणे