‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
वृत्तपत्रासंबंधी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे ध्येय हे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे आहे. दैनिकातून राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भातील मार्गदर्शक लेख प्रसिद्ध केले जातात. तसेच हिंदु धर्मातील प्रमुख सण अन् उत्सव यांमागील अध्यात्मशास्त्र, तसेच ते साजरे करण्याच्या योग्य पद्धती यांविषयीची माहिती प्रसिद्ध केली जाते. दैनिकाच्या माध्यमातून सार्वजनिक उत्सवातील गैरप्रकारांविरुद्ध जनजागृतीही केली जाते. यामुळे समाजाला धर्मशिक्षण मिळून तो धर्माचरणी बनतो. ‘समाजाला काय आवडते, यापेक्षा समाजासाठी काय आवश्यक आहे’, याचा विचार केला जातो. देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचे वृत्तांकन करतांना त्या घटनांकडे पहाण्याची योग्य दृष्टी देणारे दृष्टीकोनही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे समाजाला योग्य-अयोग्य काय, हे लक्षात येते. तसेच समाजप्रबोधन करणारी ‘बोधचित्रे’ प्रसिद्ध केली जातात; त्यामुळे समाज योग्य दिशेने विचार करण्यास प्रवृत्त होतो.
दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिदिन ८ पानी कृष्णधवल अंक प्रसिद्ध करण्यात येतात. वर्षभरात काही रंगीत विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतात. तसेच प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त रंगीत विशेषांकही प्रसिद्ध करण्यात येतात. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी १८.१२.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘सनातन प्रभात’ मध्ये रज-तम प्रधान बातम्या छापाव्या लागल्या, तरी त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होण्याचे कारण म्हणजे त्याचा सात्त्विक उद्देश आणि त्यात सेवा करणारे साधक‘सनातन प्रभात’ नियतकालिक असल्यामुळे त्यात प्रतिदिन घडणार्या रज-तम प्रधान बातम्या छापाव्या लागतात. असे असले, तरी त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते, हे उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांमुळे सिद्ध झाले आहे. या सात्त्विकतेचे कारण म्हणजे नियतकालिकाचा उद्देश सत्त्वप्रधान समाजाची आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा आहे आणि नियतकालिकात सेवा करणारे सर्वजण साधक आहेत. ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेमुळे वाचकांना आणि साधकांना त्याच्या अनुभूतीही येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले ‘सनातन प्रभात’मध्ये सात्त्विकता असल्यामुळे अनिष्ट शक्तींचा त्रास असलेले अनेकजण चैतन्य मिळण्यासाठी त्याचा वापर करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या (मराठी) गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या पुढील २ अंकांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चा १८.१२.२०१९ या दिवशी प्रसिद्ध केलेला कृष्णधवल अंक : हा ८ पानी अंक असून यात नेहमीची सदरे प्रसिद्ध करण्यात आली होती.
आ. दैनिक ‘सनातन प्रभात’चा १६.७.२०१९ या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेला रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक : हा १६ पानी अंक असून त्यामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त संतांचे संदेश (त्यांच्या रंगीत छायाचित्रांसह), सनातनचे संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतील भावस्पर्शी (रंगीत) छायाचित्रे, तसेच विशेष लेखही प्रसिद्ध करण्यात आले होते.
२. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – कृष्णधवल अंकाच्या तुलनेत रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांकामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे
दैनिक ‘सनातन प्रभात’चा कृष्णधवल अंक आणि रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत. कृष्णधवल अंक आणि रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे आणि तिची प्रभावळ अनुक्रमे ८.५८ मीटर आणि १५.७५ मीटर आहे; म्हणजे कृष्णधवल अंकाच्या तुलनेत रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांकाच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ७.१७ मीटरने अधिक आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारणे
१. दैनिक ‘सनातन प्रभात’ भाषाशुद्धीला महत्त्व देते; कारण भाषा जेवढी शुद्ध तेवढी त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.
२. दैनिकात संस्कृत सुभाषिते, श्लोक, संतांची सुवचने अर्थासहित प्रसिद्ध केली जातात. यामुळे दैनिकाच्या सात्त्विकतेत मोलाची भर पडते.
३. दैनिकात साधकांनी साधनेच्या संदर्भात केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादींचा अंतर्भाव असतो. ते वाचून साधक आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक यांची भावजागृती होते. यातून त्यांना साधनेचे प्रयत्न करण्यास किंवा ते वाढवण्यासाठी प्रेरणा मिळते.
४. दैनिकातून संतांनी सांगितलेली साधनाविषयक मार्गदर्शक सूत्रे प्रसिद्ध केली जातात. त्यामुळे साधक आणि समाज यांना संतांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ होतो.
५. दैनिकात प्रसिद्ध होणारी बहुतांश विज्ञापने ही व्यावसायिक हेतूने नव्हे, तर समाजाला योग्य साधना सांगून सेवा म्हणून मिळवली जातात. तसेच विज्ञापनांची संरचनाही सात्त्विक केली जाते. त्यामुळे त्यांतही सात्त्विकता असते.
६. दैनिकातील वृत्तांचे टंकलेखन-संकलन अन् मुद्रितशोधन, दैनिकाची संरचना आणि दैनिकांचे वितरण इत्यादी सर्व कार्ये साधक सेवाभावाने करतात.
७. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विक उद्देशामुळे त्याला आजपावतो अनेक संतांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. ईश्वरी पाठबळामुळे बंदीच्या संकटालाही त्याने निर्भीडपणे तोंड दिले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, दैनिक ‘सनातन प्रभात’चा उद्देश, तसेच दैनिकाशी संबंधित सर्व घटक सात्त्विक आहेत. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात.
३ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कृष्णधवल अंकाच्या तुलनेत रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांकातून पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारण : गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटींनी लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही ईश्वरकृपेची एक अनमोल पर्वणीच आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चा गुरुपौर्णिमा विशेषांक म्हणजे सनातनच्या साधकांसाठी अमूल्य ठेवाच आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १६.७.२०१९ या दिवशीच्या रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांकात संतांची छायाचित्रे, संतांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेले संदेश, संतांविषयीचे लिखाण इत्यादी विशेष सूत्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. यामुळे दैनिकाच्या सात्त्विकतेत अजून भर पडली. तसेच दैनिकाशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केलेली सेवा अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक भावपूर्ण झाल्याने एरव्हीच्या तुलनेत गुरुपौर्णिमा विशेषांकाची संरचना अधिक सात्त्विक झाली होती. यांमुळे रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांकातून पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.३.२०२०)
ई-मेल : [email protected]