पर्वरी (गोवा) : दैनिक ‘सनातन प्रभात’ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. हिंदूंमध्ये जागृती आणि त्यांचे प्रबोधन करणारे हे दैनिक गेली २५ वर्षे अव्याहतपणे अन् निस्पृहतेने चालवणे, ही इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. धर्मप्रेमी आणि जागृत हिंदू, राष्ट्रप्रेमी नागरिक अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ‘सनातन प्रभात’वर ठेवलेल्या विश्वासामुळे ८ लाखांहून अधिक वाचकसंख्या लाभलेले, हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असलेले ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक नियतकालिक राहिले नसून आता त्याने समस्त हिंदूंसाठी एक ‘विश्वासार्ह प्रसिद्धीमाध्यम’ म्हणून गरुडझेप घेतली आहे. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांच्या संयुक्त कार्यक्रमात ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग
शिवानंद महाराज आणि प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने गोरक्षणाचे कार्य आम्ही करत आहोत. दूध न देणार्या गायी शेतकर्यांकडून विकत घेऊन त्यांचे रक्षण करण्याचे महान कार्य महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने आम्ही करू शकलो.
महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे, जिथे गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा देण्यात आला आहे. गोवा हे एकमेव राज्य आहे, जिथे गोमातेच्या संगोपनासाठी प्रतिगाय प्रतिदिन १५० रुपये दिले जातात. त्यातून प्रेरणा घेऊन महाष्ट्रात प्रतिदिन प्रतिगाय ५० रुपये देणे आम्हाला शक्य झाले. गोव्यात गोशाळा मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योगदान द्यावे. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा, अशी आमची मागणी आहे.
राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वामीजी करत असलेल्या कार्याच्या ठायी सनातन संस्था नतमस्तक !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना अर्पण केले मानपत्र –
स्वामीजी हे आधुनिक योद्धा संन्यासी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आधुनिक जगतातील योद्धा संन्यासी आहेत. ते सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणारे राष्ट्रसंत आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराजांनी हिंदुत्वाविषयी जागृती केली आणि निवडणुकीचे चित्रच पालटले. यामुळे महाराष्ट्र विधानसभेवर लवकरच भगवा फडकणार आहे. सनातन संस्था गेल्या २५ वर्षांच्या काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जिहादी, साम्यवादी, शहरी नक्षलवादी आदींचा प्रखर विरोध सहन करून अग्नीदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडली. २५ वर्षांचा काळ हा संघर्षाचा काळ होता. आज ‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना’ म्हणून सनातन संस्था कार्य करत आहे.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे कौतुकोद्गार !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तप !
काही वर्षांपूर्वी ‘सनातन’ किंवा ‘हिंदु’ हे शब्द उच्चारणे कठीण होते. अशा विपरीत परिस्थितीत डॉ. आठवले यांच्यासारखा एक सत्पुरुष नि महात्मा निष्ठेने येथे (गोवा येथे) येऊन उभा रहातो आणि आपल्या तपाला आरंभ करतो. हा सनातन धर्माचा शंखनाद नव्हे, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठीचा शंखनाद आहे !
विविध साधकांना सांभाळणारा सनातन आश्रम !
साधे घर चालवणे, हे एक आव्हान असते; परंतु विविध साधकांना सांभाळून त्यांना घडवणे, हे सोपे काम नाही. हा चमत्कार आपल्याला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पहायला मिळतो.
‘सनातन प्रभात’ हे काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध समाजाच्या उद्धाराकरता कंबर कसून उभे राहिले !
अनुमाने २५ वर्षांपूर्वी माझ्या हातात कुणीतरी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवला. ‘सनातन प्रभात’चे नाव वाचून माझ्या मनात एकदम पहिला विचार आला की, आता अशा प्रकारची विचारसरणी आणि ‘सनातन प्रभात’ हे नाव किती दिवस टिकणार ? ते टिकावे ही माझी भूमिका; परंतु कुणीतरी काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन या समाजाच्या उद्धाराकरता कंबर कसून उभे राहिले आहे, हे बघून माझे अंत:करण आनंदाने भरून आले.
क्षणचित्रे
१. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प.पू. स्वामीजींचे स्वागत केले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.
२. सनातन आश्रमाच्या व्हिडिओचेही लोकार्पण करण्यात आले.
३. प.पू. स्वामीजी यांच्या हस्ते ‘कुंभपर्वाचे माहात्म्य’, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘नामजप कोणता करावा ?’ या मराठी ‘ई-बुक्स’चे, तर श्री. शेखर मुंदडा यांच्या हस्ते ‘कुम्भपर्व की महिमा’ या हिंदी ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.