९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशाचे वाचन
नाशिक – मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, तसेच शिक्षणातही मराठी भाषेला अग्रस्थान मिळावे, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी भाषेचा विकास, हाच आपल्या सर्वांचा ध्यास आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती एक संस्कृती आहे. यंदाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत होत असल्याने विशेष आनंद होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साहित्य संमेलनात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देणारा संदेश पाठवला होता. त्याचे वाचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.