‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कडक निर्बंध लागू !

मुंबई – कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग मुंबईत पसरू नये, यासाठी मुंबई महापालिकेने नवीन नियमावली सिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार विमान प्रवासासाठी तिकिट काढतांना विमान आस्थापनांना हमी द्यावी लागणार आहे. ‘मागील १५ दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान आस्थापनांनी ई-मेलद्वारे घ्यावी’, अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील १५ दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीचे तातडीने ७ दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. विलगीकरणासाठी उपाहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही १४ दिवसांच्या गृहविलगीकरणामध्ये रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेचे ‘रिचर्डसन ॲन्ड क्रुडास कोविड सेंटर’ हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राखीव असणार आहे.

विदेशात प्रवास करून आलेल्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाची कस्तुरबा प्रयोगशाळेत ‘जिनोम सिक्वेंसिंग तपासणी’ केली जाणार आहे. प्रतिदिन ५० सहस्र कोरोना विषाणूच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. ज्या संस्थांमधील कर्मचार्‍यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नसतील, अशा संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये दिवसांतून ६ वेळा स्वच्छ (सॅनिटाइज) केली जाणार आहेत. मुंबईतील ‘वॉर्ड वॉर रूम’ पुन्हा कार्यरत करण्यात येणार आहे. प्रत्येक कक्षात १० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक कोविड केंद्राचे लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर न करणार्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसाला २५ सहस्र जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून १९ दिवसांत १ सहस्र प्रवासी मुंबईत आले ! – आदित्य ठाकरे

दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक सहस्र प्रवासी मुंबईमध्ये आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. जे मुंबईत आहेत, त्यांना पालिकेकडून संपर्क केले जात आहेत. संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात आहे.