गुरुकार्याची प्रचंड तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा ध्यास असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (३०.११.२०२१) या दिवशी सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करत आहोत, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना ३२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. गुरुकार्याची प्रचंड तळमळ असणे

‘पू. अश्विनीताईंमध्ये गुरुकार्याची प्रचंड तळमळ आहे. त्यामुळे त्यांच्या ध्यानीमनी गुरुकार्याचा ध्यास असतो. गुरुकार्य कसे पुढे जाईल ? गुरूंचे कार्य करण्यासाठी साधकांमध्ये कोणते अडथळे आहेत ? ते त्यांना वेळोवेळी सांगून त्या साधकांना पुढे जाण्याची सतत दिशा देतात.

२. साधकांकडून चूक व्हायला नको, यासाठी योग्य मार्गदर्शन करणे

श्री. शंकर नरुटे

सेवा करतांना साधकांकडून होणार्‍या चुकांची जाणीव आणि विश्लेषण (त्या त्या वेळी फोड) करून ‘त्या चुकांमुळे आपण देवापासून कसे दूर जातो ? योग्य काय असायला हवे ?’, या दृष्टीने त्या सतत साधकांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे साधकांची ‘चूक व्हायलाच नको’, अशी आपोआपच मानसिकता निर्माण होते.

३. साधकांना साधनेचे दृष्टीकोन देऊन त्यांना घडवणे

‘साधकांमध्ये साधनेचे दृष्टीकोन बिंबवणे, साधनेची दिशा देणे’, हाच पू. अश्विनीताईंचा ध्यास असतो. त्यामुळे साधक घडतात.

४. साधकांना साधनेत पुढे नेण्याचा ध्यास असणे

पू. अश्विनीताईंना साधकांना साधनेत पुढे नेण्याचा सतत ध्यास असतो. ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा स्वतःकडून आणि सर्व साधकांकडून कशी होऊ शकते ?’, या दृष्टीने त्यांची सतत धडपड चालू असते. त्यानुसार साधकांकडूनही त्या सेवा करवून घेतात आणि स्वतःही करत असतात.

५. सेवेची आणि साधनेची साधकांना जाणीव करून देऊन ती परिपूर्ण कशी असायला हवी ? या संदर्भात सतत मार्गदर्शन करणे

सेवेची आणि साधनेची साधकांना जाणीव करून देऊन ती परिपूर्ण कशी असायला हवी, या संदर्भात सतत मार्गदर्शन करत असतात. पू. अश्विनीताईंना कोणत्याही सेवेच्या संदर्भात विचारले, तरी त्यांच्याकडे उत्तर असतेच. जरी त्यांना उत्तर ठाऊक नसले, तरी त्या त्याचा अभ्यास करतात किंवा आपल्याला अभ्यास करायला लावतात आणि त्यातून योग्य उत्तर मिळते.

६. ताईंच्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव रहात नसल्याने सेवेची फलनिष्पत्ती अधिक असणे

त्यांच्या प्रत्येक सेवेची फलनिष्पत्ती अधिक प्रमाणात आहे. सेवा करण्याची पद्धत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव रहात नाही. सर्व साधकांना आधार देणे, सर्व साधकांच्या साधनेच्या दृष्टीने त्यांनी काय करायला हवे, याचे त्या सतत चिंतन करतात. कार्य आणि साधकांची व्यष्टी साधना या दृष्टीने सांगून साधकांना साधनेत सातत्याने साहाय्य करत रहातात.

७. सहजता आणि नम्रता या गुणांमुळे साधकांना आपलेसे करून त्यांच्या मनावरचे ओझे काढून टाकणे

पू. ताईंच्या बोलण्यामध्ये नम्रता आणि सहजता असते. त्यामुळे त्या समोरच्या साधकांना सहजतेने आपलेसे करतात. त्यांच्याशी आपलेपणाने बोलून त्या साधकाच्या मनावरचे ओझे सहजतेने काढून टाकतात.’

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (१४.४.२०२१)


सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणारी पू. (सौ.) अश्विनीताई ।

श्रीमती उषा बडगुजर

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार म्हणजे, अखंड आनंदात असणारी ।
साधकांना प्रेरणा देऊन सांभाळणारी ।। १ ।।

सतत साधनेची शिकवण देणारी ।
साधकांना साहाय्य करून आनंदात ठेवणारी ।। २ ।।

निरपेक्ष प्रेम देऊन साधकांना आनंद देणारी ।
सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणारी ।। ३ ।।

आईसारखे प्रेम करून कृपेचा वर्षाव करणारी ।
‘ईश्वराप्रती भाव कसा ठेवावा ?’, हे शिकवणारी ।। ४ ।।

– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), जळगाव (१९.१.२०१९)


पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या संदर्भात सौ. अनुश्री रोहित साळुंके यांना आलेल्या अनुभूती

सौ. अनुश्री साळुंके

१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांना भेटल्यावर त्यांचे दृष्टीतील चैतन्य आणि त्यांचे बोलणे यांमुळे ‘स्वतःवरील त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे’, असे जाणवणे

‘मी काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेव्हा मला ‘पू. (सौ.) अश्विनी पवार यांना भेटावे’, असे वाटले. आमच्या भेटीच्या वेळी त्यांच्या प्रेमळ दृष्टीने माझे मन लगेच स्थिर झाले. आम्ही बोलत असतांना त्या माझ्याकडे बघत होत्या. थोड्या वेळाने त्या माझ्या डोळ्यांतही बघत होत्या. त्या वेळी ‘माझ्या डोळ्यांभोवतीचे त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला तीव्रतेने जाणवले. मी त्यांना म्हणाले, ‘‘माझ्यावरील आवरण न्यून होत आहे’, असे मला वाटत आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हो. आवरण न्यून होत आहे.’’ ‘देवाच्या कृपेने मला संतांमधील चैतन्याची ही बुद्धीच्या पलीकडील अनुभूती घेता आली’, यासाठी मी कृतज्ञ आहे.

२. पू. (सौ.) अश्विनी पवार यांची आठवण आल्यावर लगेचच त्यांचा भ्रमणभाष येणे

मी गोव्याला असतांना काही वेळा मला पू. (सौ.) अश्विनीताई यांची तीव्रतेने आठवण येऊन ‘त्यांच्याशी बोलावे’, असे वाटते; परंतु ‘आपल्यामुळे संतांचा वेळ जायला नको’, या विचाराने मी त्यांना भ्रमणभाष करत नाही. अशा वेळी अकस्मात् त्यांचाच मला भ्रमणभाष येतो. यावरून ‘संतांना आपल्या मनातील कळते’, हे माझ्या लक्षात आले. तसेच ‘अध्यात्म हे खरोखर बुद्धीच्या पलीकडील शास्त्र आहे’, हेही मला समजले.’

– सौ. अनुश्री रोहित साळुंके (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक