संसदेत तीनही कृषी कायदे रहित

चर्चेविना कायदे रहित केल्याने विरोधकांकडून गदारोळ !

सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी संसदेेमध्ये केंद्र सरकारने पूर्वी संमत केलेले तीनही कृषी कायदे रहित करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला; मात्र हा प्रस्ताव चर्चेविना संमत करण्यात आल्याने विरोधकांनी गदारोळ केला. हे कृषी कायदे रहित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांकडून आंदोलन चालू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी हे कायदे रहित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतही याला संमती देण्यात आली होती.

काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटले की,  चर्चेविना हे तिन्ही कायदे रहित करण्यात आले आहेत. जर चर्चा झाली असती, तर उत्तर द्यावे लागले असत.’