वरिष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे ‘विदेशी आक्रमण आणि सभ्यतांमधील द्वंद्व’ या विषयावर पर्वरी येथे व्याख्यान
पणजी, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – ब्रह्मांडाची रचना झाली, तेव्हापासून सनातन धर्म आहे. सनातन धर्मातील प्रत्येक आचारविचार हा वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही सिद्ध करता येऊ शकतो. सनातन धर्म सर्वश्रेष्ठ असूनही या धर्माविषयी हिंदूंमध्ये नकारात्मकता आहे. ‘इतरांचे ते चांगले आणि आपले ते बुरसटलेले’, असे हिंदूंना वाटते. विदेशी मानसिकतेच्या गुलामगिरीमुळे आम्ही ‘सत्य’ सांगण्यास घाबरतो. ‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीमुळे आपला सनातन धर्माविषयीचा अभिमानही नष्ट झाला आहे. आज ९० कोटी हिंदूंनी तथ्य समजून घेऊन जे खोटे आहे, ते उभे राहून ‘खोटे आहे’ असे सांगण्याचे धाडस निर्माण केले पाहिजे. देशाला सीमा आहेत आणि देश चालवण्यासाठी सर्व व्यवस्था आपल्याकडे आहे; मात्र राष्ट्र, परंपरा, संस्कृती आणि श्रद्धा या देशापेक्षा श्रेष्ठ आहेत. प्रत्येक सनातनी हिंदूने जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. निवडणुकीत २ रुपये किलो दराने तांदुळ देणार्या किंवा विनामूल्य वीज देणार्या पक्षाला नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीला सर्वाेच्च प्राधान्य देऊन आपण आपले मत दिले पाहिजे, असे आवाहन वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
‘भारत विकास परिषद, गोवा प्रांत’ आणि तिच्या संलग्न पर्वरी शाखा यांनी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘विदेशी आक्रमण आणि सभ्यतांमधील द्वंद्व’ या विषयावर श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ बोलत होते. श्री. कुलश्रेष्ठ यांनी त्यांच्या व्याख्यानात पुढील महत्त्वपूर्ण सूत्रे मांडली.
१. हिंदु युवकांना शाळा किंवा महाविद्यालय या ठिकाणी सनातन हिंदु धर्माविषयी तर्कशुद्ध माहिती मिळत नसल्याने त्यांना सनातन धर्माबद्दल संशय निर्माण होतो आणि पुढे त्यांना ‘इतरांचे ते चांगले’ असे वाटू लागते. हिंदूंना आज संसदेत काय चालते ? कोणत्या विषयावर सार्वजनिक चर्चा चालू आहे ? यामध्ये रस नाही, तर ते संकुचित वृत्तीचे झाले आहेत. समाजात सुधारणा केवळ लोकप्रतिनिधी आणि हिंदु संघटना यांनीच करावी, असे त्यांना वाटते.
२. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे उलटल्यानंतर आज देश सत्य ऐकून ते समजून घेण्यासाठी सिद्ध झाला आहे, ही एक जमेची बाजू आहे.
३. सनातन हिंदु संस्कृतीने कधीही दुसरा धर्म किंवा पंथ यांविषयी द्वेष करायला शिकवले नाही; मात्र वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेमध्ये ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द घुसवण्यात आला. राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, तर ‘बहुसंख्य’ आणि ‘अल्पसंख्य’ असा भेदभाव का केला जातो ? आज सच्चर आयोग (मुसलमानांसाठी अवास्तव सुविधा, योजना सुचवणारा आयोग) का निर्माण केला आहे ? ‘सेक्युलर’ हा शब्द आपल्या माथी मारला जात आहे आणि यामुळे सनातन हिंदु धर्माची फार मोठी हानी झाली आहे.
४. वास्तविक धर्म याचा अर्थ ‘आपले दायित्व आणि कर्तव्य’, असा आहे. हिंदूंनी कपाळाला टिळा लावल्यास त्याला कट्टरवादी म्हटले जाते, तर मुसलमानाने नमाजपठण केल्यास त्याचा सन्मान केला जातो.