असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक
सातारा – जावळी तालुक्यातील कोलेवाडी येथील प्रकाश दीनकर तरडे यांचा मुलगा हरवला आहे. त्यांनी १९ नोव्हेंबर यादिवशी मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेअंतर्गत येणार्या कुडाळ दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात माहिती दिली; मात्र तेथील एका पोलिसाने तरडे यांच्याकडे मुलाच्या शोधासाठी १ सहस्र रुपयांची मागणी केली.
याविषयी हताष झालेल्या तरडे यांनी २२ नोव्हेंबर यादिवशी थेट सातारा पोलीस मुख्यालय गाठले आणि घडलेला सर्व प्रकार वरिष्ठ पोलिसांच्या कानावर घातला. सातारा पोलीस मुख्यालयातून याची गंभीर नोंद घेऊन तातडीन कुडाळ दूरक्षेत्राला दूरभाष करण्यात आला. तेव्हा कुडाळ दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातील पोलीस खडबडून जागे झाले आणि तरडे यांच्या मुलाच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली. तरडे यांच्या मुलाचा शोध चालू असून अद्याप याविषयी पोलिसांना काहीही माहिती मिळालेली नाही. (अनेक वेळा अडचणीत असलेल्या नागरिकांना पोलीस ठाण्यात जायला नको, असे वाटते; कारण तिथे तक्रार करणार्यांचीच उलट चौकशी करणे, त्यांना दरडावून बोलणे, त्यांच्याकडे लाचेची मागणी करणे, असे प्रकार पोलिसांकडून होतात. पोलिसांच्या सर्वच अपवर्तनाची गंभीर नोंद घ्यावी, हीच अपेक्षा ! – संपादक)