वागातोर येथे २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न’ होणार !

‘पर्सेप्ट लाईव्ह’, ‘सनबर्न’चे आयोजक

मुख्यमंत्र्यांनी ‘सनबर्न’ नाही’, असे सांगितल्यानंतर २ दिवसांत आयोजक त्याची घोषणा करतात, याचा अर्थ ‘सनबर्न’चे आयोजक गोवा शासनाला जुमानत नाहीत का ?

पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यंदा ‘सनबर्न’ महोत्सवाला शासनाने अनुमती नाकारल्याची घोषणा केल्यानंतर २ दिवसांतच ‘सनबर्न’चे आयोजक ‘पर्सेप्ट लाईव्ह’ यांनी एक प्रसिद्धपत्रक काढून यंदा वागातोर येथे २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

‘पर्सेप्ट लाईव्ह’ प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या सल्ल्यानुसार कोरोना महामारीमुळे पूर्वीप्रमाणे ‘सनबर्न’ महोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा न करण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला आहे; मात्र कोरोना महामारी सध्या आटोक्यात येत असल्याने आणि गोव्यातील ‘नाईट लाईफ्’ (रात्रीचे पर्यटन) सध्या पूर्वपदावर येत असल्याने ‘हिलटॉप’ वागातोर येथे यंदा २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. सर्वांची अनुमती घेऊनच हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. (वादग्रस्त ‘सनबर्न’ मधून पाश्‍चात्त्य विकृतीला प्रोत्साहन मिळत आहे. समाज चंगळवादाकडे झुकून नैतिकता हरवत चालला आहे. हिंदु संस्कृती नष्ट होत आहे ! अमली पदार्थांच्या गर्तेत भारतीय युवा पिढी नासवली जात आहे. यासाठी गोवा ‘अमली पदार्थ’मुक्त, ‘ईडीएम्’मुक्त आणि ‘सनबर्न’मुक्त करा, असे प्रत्येक राष्ट्रप्रती आणि धर्मप्रेमी नागरिकाला वाटते ! – संपादक)