संभाजीनगरमधील छोट्या व्यावसायिकांच्या गळ्याभोवती ‘नंबर’ सावकारीचा फास !

  • प्रतिमास २ कोटी रुपयांची उलाढाल !     

  • सावकारी गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

लोकांनी घेतलेल्या कर्जावर भरमसाठ व्याज लावून त्यांच्याकडून पैशांची वसुली करणे हा गुन्हा आहे. असे असतांनाही पोलीस सावकारीच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत, हे दुर्दैवी आहे. 

संभाजीनगर – शहरात छोटे व्यावसायिक अवैध खासगी सावकारीच्या जाळ्यात ओढले जात आहेत. फळविक्रेते, हातगाडीवर कपडे विकणारे, पानटपरीचालक आणि इतर छोटे व्यापारी यांच्या गळ्याला सावकारीचा फास लागला आहे. ‘क्रमांक’ पद्धतीने चालणार्‍या या सावकारीमध्ये व्याजदरही भरभक्कम आहे. मुद्दल ७० सहस्र रुपये देऊन १०० दिवसांत प्रतिदिन १ सहस्र रुपये याप्रमाणे सावकार मंडळी तब्बल १ लाख रुपये वसूल करत आहेत. ज्यांची ओळख नाही अशा लोकांना कर्ज देतांना तारण म्हणून सोने, दुचाकीची इसारपावती आणि धनादेश आदी घेतले जाते.

शहरात या पद्धतीच्या सावकारीतून दरमास २ कोटी रुपयांची उलाढाल होते. ही सावकारी पूर्णपणे ‘क्रमांक’ पद्धतीवर चालते. ‘मला ५ ‘क्रमांक’ पाहिजे’, असे एखादा व्यावसायिक म्हणाला की, त्याला ३५ सहस्र रुपये देऊन १०० दिवसांत प्रतिदिन ५०० याप्रमाणे ५० सहस्र रुपये वसूल केले जात आहेत. ‘५ क्रमांक’ म्हणजे प्रतिदिनचे ५०० आणि १०० दिवसांनी ५० सहस्र रुपये, असे हे गणित आहे. ‘कोडवर्ड’ म्हणून ‘क्रमांक’ हा शब्द वापरला जातो. या व्यवहारात प्रतिदिन पैशांची परतफेड करावीच लागते. समजा १०० रुपये प्रतिदिनचा हप्ता असेल आणि एखाद्या वेळी पैसे नसतील, तर ५० रुपये दंड द्यावा लागतो. हा दंड व्याजात किंवा मुद्दल यांमध्ये गणला जात नाही. ज्या दिवशी दंड भरला, त्या दिवशीचा पूर्ण हप्ता दुसर्‍या दिवशी भरावाच लागतो.

कोण आहेत हे सावकार ?

छोट्या व्यवसायातून हाताशी आलेले पैसे आणि राजकीय पक्षांशी निगडित गुंड प्रवृत्तीचे लोक सावकारीचा व्यवसाय करत आहेत. गुलमंडी, नारळीबाग, शिवाजीनगर, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, पैठण गेट, अंगुरीबाग, कुंभारवाडा, औरंगपुरा आणि खडकेश्वर या भागांत सावकार आणि मध्यस्थ यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.