अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई होणार !

पुणे – समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ‘भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती’ आणि राज्यशासनाची ‘शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती’ योजना यासंदर्भात राज्यातील विविध महाविद्यालयांकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे आधी शुल्क भरून नंतर शिष्यवृत्तीची परतफेड करावी, अशी मागणी होत आहे. शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत. या तक्रारींची नोंद घेऊन समाजकल्याण विभागाने शासनाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या महाविद्यालयांवर तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भातील पत्र राज्यातील विद्यापिठांना दिले आहे; अशी माहिती मुंबई शहराचे साहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिली.