सांगवडेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण
सांगवडेवाडी (जिल्हा कोल्हापूर, तालुका-करवीर), २५ नोव्हेंबर (वार्ता.) – ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये घरोघरी किल्ले बांधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीचा आदर करतो, त्याप्रमाणे महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेले दुर्ग आणि किल्ले यांचे जतन करणे हेही युवकांचे दायित्व आहे. या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण, गोहत्या, धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, आर्थिक जिहाद, अशा अनेक समस्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत. या विरोधातही युवकांनी कृती करणे अपेक्षित आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश शेटे यांनी केले. हालसुर्डे, सांगाव, सांगवडेवाडी या ३ गावांसाठी ‘छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान’च्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २२ नोव्हेंबर या दिवशी त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
श्री. नीलेश शेटे पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर हिंदु युवकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होऊन बलोपासनेला आरंभ करूया.’’ या स्पर्धेच्या आयोजनात श्री. अजित जाधव आणि श्री. ऋषिकेश खोचगे यांचा पुढाकार होता. या प्रसंगी ५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. व्याख्यान झाल्यावर उपस्थित तरुणांकडून साप्ताहिक स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी आली.