परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप

पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !

परमबीर सिंह आणि अजमल कसाब

मुंबई – २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत आतंकवादी आक्रमण करणारा अजमल कसाब याचा दूरभाष परमबीर सिंह यांनी लपवला होता, असा खळबळजनक आरोप निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. याविषयी चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण

पठाण पुढे म्हणाले, ‘‘डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांना कसाबकडे एक भ्रमणभाष सापडला. तो भ्रमणभाष पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. कसाब याला गिरगाव चौपाटीवर ज्या ठिकाणी पकडण्यात आले, तेथे परमबीर सिंह हेही उपस्थित होते. त्या वेळी परमबीर सिंह यांनी तो दूरभाष स्वत:कडे ठेवला. त्यांनी तो भ्रमणभाष या प्रकरणाचे अन्वेषण अधिकारी रमेश महाले यांच्याकडे द्यायला हवा होता, म्हणजे या आक्रमणात कुणी पाकिस्तानी म्होरके आणि कुणी आतंकवादी सहभागी होते का ? हे कळू शकले असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांनी याविषयी तत्कालीन अतिरिक्त पोलीस निरीक्षक व्यंकटेश यांना सांगितले होते. त्यांनी भ्रमणभाष आणण्यासाठी माळी यांना पाठवले; मात्र परमबीर सिंह हे ‘कुठला भ्रमणभाष ? गेट आऊट’ असे बोलले. परमबीर सिंह हे अतिशय भ्रष्ट अधिकारी आहेत. आतंकवादी आक्रमणापूर्वी अजमल कसाब याने भारतात ज्या लोकांशी संपर्क साधला होता, त्या सर्वांना बोलावून परमबीर सिंह यांनी पैसे घेतले.’’