सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

‘ते पुस्तक विकत घेऊ नका किंवा वाचू नका’, असे का सांगत नाही ? – देहली उच्च न्यायालयाचा प्रश्न

देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले, ‘तुम्ही लोकांना ‘ते पुस्तक विकत घेऊ नका किंवा वाचू नका’, असे का सांगत नाहीत ? प्रत्येकाला सांगा की, पुस्तक वाईटरित्या लिहिलेले आहे आणि ते वाचू नका. जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर ते दुसरे काही तरी चांगले वाचू शकतात.’

याचिकाकर्त्याने या पुस्तकामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पुस्तकामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, हे प्रकरण संपूर्ण पुस्तकाशी संबंधित नसून एका उतार्‍याशी आहे. तुम्हाला प्रकाशकाचा परवाना रहित करायचा असेल, तर ते वेगळे प्रकरण आहे.