गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या आमदार आणि खासदार यांच्यावर आजीवन बंदीविषयी केंद्राची नेमकी भूमिका काय ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

सरकारच्या भूमिकेखेरीज अशा लोकप्रतिनिधींवर निवडणूक लढवण्याची बंदी घालणे शक्य नाही !

नवी देहली – गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या किंवा गुन्हा सिद्ध होऊन २ वर्षे किंवा अधिक शिक्षा झालेल्या आजी-माजी आमदार किंवा खासदार यांवर आजीवन बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार सिद्ध आहे का ? तुम्हाला यावर भूमिका घ्यावीच लागेल. जोपर्यंत तुम्ही यावर काही ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत आम्ही अशा सदस्यांवर निवडणूक लढवण्यासाठी आजीवन बंदी घालण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देऊ शकत नाही, अशा शब्दांत सरन्यायाधीश एन्.व्ही. रमण्णा यांनी केंद्र सरकारला प्रश्‍न विचारला आहे.

वर्ष २०१६ मध्ये भाजपचे नेते आणि अधिवक्ता श्री. अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी यासंदर्भात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र त्यावर अजूनपर्यंत निर्णय होऊ शकलेला नाही. यासंदर्भात दुसर्‍या एका प्रकरणाची सुनावणी चालू असतांना न्यायालयाने वरील प्रश्‍न विचारला. यासंदर्भात केंद्र सरकारची बाजू मांडणारे अधिवक्ता एस्.व्ही. राजू यांनी ‘याविषयी सरकारशी चर्चा करण्याची आवश्यकता असून त्यानंतर भूमिका मांडता येईल’, असे न्यायालयाला सांगितले.