ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे तरुणावर अत्याचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास अटक !

  • पोलीस विभागाला कलंक असणारे पोलीस कर्मचारी ! – संपादक
  • जनतेचे रक्षण दूरच, तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस हे वर्दीतील गुन्हेगार ! – संपादक

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – ईश्वरपूर येथे तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याच्याकडून खंडणी मागणार्‍या ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर याला अटक करण्यात आली आहे. (समाजाला गुन्हेगारीपासून संरक्षण देणारेच गुन्हेगारी कृत्य करायला लागले, तर समाजाने न्याय कुणाकडे मागायचा ? गुन्हेगारी वृत्तीच्या अशा पोलिसांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

१. पीडित तरुण हा शहरात उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ३ च्या सुमारास हा तरुण त्याच्या मैत्रिणीला भेटून वसतीगृहाकडे जात होता. त्या वेळी पहार्‍यावर असणारा पोलीस कर्मचारी हणमंत देवकर याने त्याला अडवून त्याचे अन्वेषण केले आणि तरुणाकडून भ्रमणभाष क्रमांक मागून घेतला.

२. देवकर याने काही दिवसांनंतर पीडित तरुणाला ‘तुझ्या प्रेमप्रकरणाची घरी, तसेच महाविद्यालयात माहिती देऊन तुझी अपकीर्ती करेन’, अशी धमकी देत त्याच्याकडून ४ सहस्र रुपये घेतले. यानंतर देवकर याने तरुणाकडे वारंवार पैशाची मागणी केली. त्याही पुढे जाऊन ‘तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांग’ अशी मागणी केली. असे करण्यास नकार दिल्यावर संबंधित तरुणाला देवकर याने त्याच्या खोलीवर नेऊन तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी दिली.

३. यानंतर घाबरलेल्या तरुणाने त्याच्या मित्राच्या सहकार्याने याची माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. गेडाम यांच्या सूचनेवरून तरुणाने या प्रकाराविषयी ईश्वरपूर येथे गार्‍हाणे दिल्यावर पोलीस कर्मचारी देवकरला अटक करण्यात आली आहे.