प्रेमाने सर्वांशी जवळीक साधणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या अकलूज येथील सौ. प्रियांका जयदीप जठार !

प्रेमाने सर्वांशी जवळीक साधणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सौ. प्रियांका जयदीप जठार (वय २८ वर्षे) !

अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सौ. प्रियांका जठार यांना त्यांच्या विवाहापूर्वी सनातन संस्थेविषयी काहीच ठाऊक नव्हते. विवाहानंतर साधना समजल्यावर त्यांनी त्वरित सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला आणि त्या झोकून देऊन साधना करू लागल्या. साधना करतांना त्या घराचे दायित्वही सांभाळत आहेत. त्यांच्यातील प्रेमभावाने त्यांनी सर्वांना जोडून ठेवले आहे. सौ. प्रियांका यांच्या सासूबाईंना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. प्रियांका जयदीप जठार

१. मितभाषी

‘सौ. प्रियांका मितभाषी असून आवश्यक तेवढेच बोलते.

२. ती अभियंता (इंजिनीयर) असूनही तिचे रहाणीमान साधे आहे.

३. व्यवस्थितपणा

ती घेतलेली वस्तू पुन्हा त्याच जागेवर ठेवते. ती घराला आश्रम समजून सर्व सेवा मनापासून करते. ‘साहित्य कशा प्रकारे ठेवल्यावर ते अधिक चांगले दिसेल ?’, असा तिचा विचार असतो आणि त्याप्रमाणे ती प्रयत्न करते.

४. काटकसरी

ती स्वयंपाकात तेल किंवा इतर साहित्य यांचा अल्प प्रमाणात वापर करते, तरी तिने केलेले पदार्थ चविष्ट होतात.

सौ. उल्का जठार

५. प्रेमळ

अ. ती लहान असतांनाच तिचे वडील वारल्याने तिला वडिलांचा विशेष सहवास लाभला नाही; मात्र ती तिच्या सासर्‍यांची वडिलांप्रमाणे काळजी घेते. ती त्यांना वेळेवर जेवायला देते आणि त्यांना औषधे घेण्याची आठवणही करून देते. हे सर्व ती अतिशय प्रेमाने करते.

आ. साधकांचा भ्रमणभाष आला, तर ती त्यांच्याशी प्रेमाने बोलते.

६. शिकण्याची वृत्ती

सोलापूर सेवाकेंद्रातील पायपुसणी पाहून तिने घरासाठीही तसे पायपुसणे शिवण्याचा प्रयत्न केला. ती संगणकीय माहितीजालावर पाहून स्वतःचा पोशाखही शिवते.

७. स्वीकारण्याची वृत्ती

विवाह झाल्यानंतर ‘मी नोकरी करून साधना करते’, असे ती आम्हाला म्हणाली. तेव्हा तिला तिच्या यजमानांनी (माझ्या मुलाने) साधना सांगितली आणि ‘साधनेला प्रथम प्राधान्य देऊया’, असेही सांगितले. तिने ते लगेच ऐकले आणि साधनेला आरंभ केला. ‘सर्वांच्या समवेत नामजप, सेवा, तसेच व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे’, हे सर्व तिने मनापासून चालू केले.

८. समाधानी

तिच्या आवश्यकता अल्प आहेत. ती स्वतःहून कधीच काही मागत नाही. ‘तुला काही आणायचे का ?’, असे तिला विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मला काही नको. मला काही घ्यावेसे वाटत नाही. परम पूज्यांनी मला पुष्कळ काही दिले आहे. ‘एवढे मिळेल’, असे मला वाटले नव्हते.’’

९. साधकांना सेवेत साहाय्य करणे

अ. भ्रमणभाषवरील काही सेवा करण्यासाठी साधकांना अडचणी असतील, तर ती त्या सेवांमध्ये साधकांना साहाय्य करते.

आ. ‘घरातील काही सेवा मी करते’, असे मी तिला म्हटले, तर ती मला काही करू देत नाही. ‘तुम्ही तुमची सेवा करा’, असे ती मला म्हणते.

१०. भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी तिच्या मनात पुष्कळ भाव आहे. तिच्या मनात नेहमी ‘परम पूज्यांना काय आवडेल ?’, असाच विचार असतो.’

– सौ. उल्का जठार (सासूबाई, ६५ टक्के आध्यात्मिक पातळी), अकलूज, जिल्हा सोलापूर. (२०.७.२०२१)


सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांना सौ. प्रियांका जठार यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (कु.) दीपाली मतकर

१. प्रियांकाताईच्या प्रथम भेटीतच ‘तिच्याशी आधीची ओळख आहे’, असे वाटणे

‘सौ. प्रियांकाताईचे लग्न झाल्यावर मी अकलूज येथे जठारकाकूंच्या घरी पहिल्यांदाच तिला भेटले. तेव्हा मला ती अनोळखी वाटत नव्हती. ‘जणू मी रामनाथी आश्रमातील साधिकेशीच बोलत असून आमची आधीची ओळख आहे’, असे मला वाटत होते.

२. नम्र

प्रियांकाताई उच्चशिक्षित असूनही नम्र आहे. ती स्वतःकडे न्यूनपणा घेऊन सर्व कृती करते. तिच्या वागण्यात कुठेच अहं जाणवत नाही.

३. प्रेमभाव

अ. मी त्यांच्या घरी निवासाला असतांना ती मला सतत ‘काही देऊ का ? काही हवे का ?’, असे प्रेमाने विचारते. ती सतत मला काही ना काही खाऊ खायला देते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिची सगळ्यांशी लगेचच जवळीक होते.

आ. घरी कुणी साधक किंवा पाहुणे आल्यास ती त्यांचे सर्व व्यवस्थित आणि प्रेमाने करते.

४. सासूबाईंना साधनेत साहाय्य करणे

तिचे लग्न झाल्यानंतर जठारकाकू जिल्ह्यातील सेवांसाठी सोलापूर सेवाकेंद्रात जातांना तिला म्हणाल्या, ‘‘आता तुला एकटीला रहावे लागणार.’’ तेव्हा ती अगदी प्रेमाने हसून काकूंना म्हणाली, ‘‘तुम्ही इथे असलात, तर मला चांगलेच वाटते. मला एकटीला रहायला नको वाटते; पण माझ्यामुळे तुमची सेवा थांबायला नको. तुम्ही निश्चिंत मनाने जा आणि सेवा करा.’’

५. सेवाभाव

अ. प्रियांका सोलापूर सेवाकेंद्रात रहायला आल्यावर सेवाकेंद्रातील सर्व नियमांचे पालन करते. तिला दिलेली सेवा ती शांतपणे करते. तिला संतसेवा मिळाली होती. तिने ती सेवा भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ‘संतांच्या कपड्यांना इस्त्री करणे किंवा त्यांची खोली आवरणे’, या सेवा तिने मनापासून केल्या.

आ. ताई प्रत्येक कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण करते. तिने केलेली सेवा पाहून भाव जागृत होतो.

६. ती सतत अंतर्मुख असते.

७. साधनेची तळमळ

अ. ताईला तिच्या विवाहाआधी सनातनविषयी काहीच ठाऊक नव्हते. तिच्या लग्नानंतर तिला साधना समजली. त्यानंतर ती सेवाकेंद्रात रहायला आली होती. तेव्हा ‘मलाही तुमच्यासारखी पूर्णवेळ सेवा करावी’, असे वाटते’, असे ती मला म्हणाली.

आ. ताई सतत सत्संगात रहाण्यासाठी प्रयत्न करते. सेवा करतांना ती भ्रमणभाषवर सनातनचे संत किंवा सद्गुरु यांचे मार्गदर्शन किंवा सत्संग यांचे ‘ऑडिओ’ लावून ऐकते. त्यातून शिकून ती तसे प्रयत्नही करते.

८. भाव

अ. गर्भवती असतांनाही ताई घरातील सर्व कामे करायची. ‘सकाळपासून तू सतत कामे करत आहेस. दमली असशील ना ?’, असे तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मी कुठे करते ? कृष्णच सर्व करतो. गुरुदेवच सर्व करवून घेतात. त्यामुळे मी थकत नाही.’’

आ. ‘स्वयंपाक आणि संगणकीय सेवा करणे, भांडी घासणे, कपडे धुणे’ इत्यादी कुठलीही कृती ती तन्मयतेने आणि प्रेमभावाने करते. ताईकडे पाहून ‘ती गोपीभावात आहे. श्रीकृष्णाच्या समवेतच आहे’, असे जाणवते. तिला याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘हो ताई. मी ‘सतत कृष्णाच्या गोकुळात आहे’, असाच भाव ठेवते.’’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (२०.७.२०२१)