आझाद मैदानावर आंदोलन करणारे अतिरेकी आहेत का ?

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा परिवहनमंत्र्यांना संतप्त प्रश्न !

डावीकडून अनिल परब आणि गोपीचंद पडळकर

मुंबई – परिवहनमंत्री अनिल परब नियमित तेच तेच बोलत आहेत. त्यांच्याकडे नवीन सांगायला काहीच नाही. त्यांनी आझाद मैदानावर येऊन ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांशी बोलावे. आंदोलन करणारे अतिरेकी आहेत का ?, असा प्रश्न एस्.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केला.

या वेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘सरकार वेळकाढूपणा करत आहे. आंदोलन करणारे कर्मचारी त्यांचेच आहेत. या कर्मचार्‍यांचे पालकत्व त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने त्यांनी अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलण्यास सिद्ध आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत एस्.टी.चा विषय असूनही संपाला २५ दिवस होऊनही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकार निर्णयक्षम नाही, तसेच सरकारमध्ये एकमतही नाही. एस्.टी. कर्मचार्‍यांच्या विलगीकरणाविषयीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी.’’