लेखक अक्षय जोग यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे – आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशन !
मुंबई, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या बोलण्याने ‘स्वातंत्र्यचळवळीचा अपमान होतो’, असे म्हटले जाते; मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘देशद्रोही’ म्हटले जाते, तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा अपमान होत नाही का ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून त्यांची अपकीर्ती केली जाते. त्यांच्यावर करण्यात येणार्या टीकेला अक्षय जोग यांनी तर्कशुद्ध आणि स्पष्टपणे उत्तरे दिली आहेत. हे पुस्तक युवा पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे वरिष्ठ संपादक श्री. वैभव पुरंदरे यांनी व्यक्त केला. १९ नोव्हेंबर या दिवशी वडाळा येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि युवा लेखक श्री. अक्षय जोग यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे – आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना श्री. पुरंदरे यांनी वरील मनोगत व्यक्त केले.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापूर्वी अनेक क्रांतीकारकांनी कारागृहातून सुटकेसाठी आवेदने दिली होती; म्हणून ते देशद्रोही ठरत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याइतकी शिक्षा आणि छळ कुणा क्रांतीकारकाचा झाला नाही. त्यांची राजकीय मते सर्वांना पटायलाच हवीत, असे नाही; परंतु त्यांचे राष्ट्रकार्य अजोड आहे’, असेही या वेळी श्री. वैभव पुरंदरे यांनी म्हटले.
सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठानचे सचिव श्री. रवींद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी पुस्तकाचे लेखक श्री. अक्षय जोग आणि पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे कार्यवाह अन् पुस्तकाचे प्रकाशक श्री. महेश पोहनेरकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे मुख्य अधिकारी श्री. उत्तम पवार यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रभक्ती वादातीत ! – रवींद्र साठे, सचिव, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई
भारतमातेला सर्वाेच्च स्थानी मानून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी कार्य केले. आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून द्यायला हवी. वैचारिक विरोध असू शकतो; पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रभक्ती वादातीत होती.
या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या अपप्रचाराला नम्रपणे प्रतिवाद करण्यात आला आहे. सामान्य वाचकांनाही समजेल, अशी सोपी भाषाशैली पुस्तकात वापरण्यात आली आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच उपलब्ध होईल, असे या वेळी पुस्तकाचे लेखक श्री. अक्षय जोग यांनी सांगितले. श्री. अक्षय जोग यांनी यापूर्वी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ हे पुस्तक लिहिले असून त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडण करण्यात आले आहे. यासह ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : परिचित-अपरिचित’ हे पुस्तकही श्री. जोग यांनी लिहिले आहे. ही सर्व पुस्तके हवी असल्यास श्री. धनाजी जाधव (भ्र.क्र. ९५९४९९३८३४) यांच्याकडे उपलब्ध होऊ शकतील.