इयत्ता १ ली ते ५ वीच्या शाळा चालू करण्यास ‘टास्क फोर्स’ अनुकूल नाही !

‘टास्क फोर्स’चे प्रमुख आधुनिक वैद्य संजय ओक

मुंबई – राज्यातील इयत्ता १ ली ते ५ वीच्या शाळा चालू करण्यास ‘टास्क फोर्स’ अनुकूल नाही, अशी माहिती ‘टास्क फोर्स’चे प्रमुख आधुनिक वैद्य संजय ओक यांनी दिली आहे. शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी आणि ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्ग चालू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात इयत्ता १ ली पासूनच्या शाळा चालू करण्यास शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती; मात्र कोरोनाविषयीच्या ‘टास्क फोर्स’ने राज्यातील १ लीपासूनच्या शाळा चालू करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण झाल्याविना शाळा चालू करणे योग्य होणार नाही’, असेही मत आधुनिक वैद्य संजय ओक यांनी व्यक्त केले आहे.

‘लहान मुलांचे लसीकरण चालू करावे, यासाठी २२ नोव्हेंबरच्या बैठकीत ‘टास्क फोर्स’ राज्य सरकारला विनंती करणार आहे, असे आधुनिक वैद्य संजय ओक यांनी सांगितले.

अमेरिकेत कोरोनाबाधित मुलांच्या संख्येत वाढ !

‘मुखपट्टी (मास्क) ही पहिली लस आहे; पण गेल्या काही दिवसांपासून लोकांनी ती घालणे टाळले. यामुळेच तिसरी लाट येणारच नाही, असे म्हणता येणार नाही. अमेरिकेत मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढल्याने मुलांचे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात स्थलांतर केले जात आहे. ही परिस्थिती आपल्या राज्यात येऊ द्यायची नाही’, असेही आधुनिक वैद्य ओक यांनी सांगितले.