‘पू. जयराम जोशी यांचे वास्तव्य गेली अनेक वर्षे मिरज येथील सनातनच्या आश्रमात आहे. मी सांगलीत रहात असतांना मला अनेक वर्षे मिरज आश्रमात जाण्याचे आणि अनेक संतांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी मला पू. जोशीआबा यांचा सहवास लाभला. परात्पर गुरुदेव आणि पू. जोशीआबा यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञतापुष्पे पुढे दिली आहेत.
१. प्रथम भेटीतच आपलेसे करून घेणारे पू. जयराम जोशीआबा !
काही वर्षांपूर्वी पू. जोशीआबा मिरज आश्रमात रहायला आले. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा श्री. योगेशदादा, सून सौ. भाग्यश्रीताई आणि नात कु. ऐश्वर्या (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हेही आश्रमात रहायला आले. त्या वेळी मी शनिवार, रविवार, तसेच सुटीच्या दिवशी मिरज आश्रमात सेवेसाठी जात असे. पू. आबांनी आमच्या प्रथम भेटीतच सहजतेने बोलून मला आपलेसे करून घेतले. त्यांचा हसतमुख तोंडवळा पाहून मलाही पुष्कळ आनंद होत असे आणि मी माझा त्रास विसरत असे. मला त्यांच्याशी बोलतांना कधीही संकोच वाटत नसे.
२. नम्रतेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पू. आबा !
पू. आबा म्हणजेच नम्रता ! लहान-मोठे कुणीही असो, पू. आबा सर्वांशी नम्रतेने बोलतात. ‘ते कधीही कुणाचे मन दुखावेल’, असे बोलले नाहीत. ‘हे त्यांच्या वाणीचे तपच आहे’, असे मला वाटते.
३. पू. आबांच्या आश्वासक बोलण्याने उत्साह वाढून साधना करायला प्रेरणा मिळणे
अ. मी आश्रमात गेल्यावर प्रत्येक वेळी पू. आबा हसून आणि स्वतःहून बोलून माझी विचारपूस करत असत. मी सेवा करत असतांना पू. आबा मला सतत प्रोत्साहन देत असत. ते मला नेहमी सांगायचे, ‘जमेल तुला.’ त्यांच्या या आश्वासक बोलण्याने माझा उत्साह वाढून मला साधना करायला प्रेरणा मिळत असे.
आ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ अंकांची सेवा मिरज आश्रमात चालू झाली. पू. आबांकडे प्रारंभी त्याचे दायित्व होते. पू. आबा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांच्या घड्या घालणे आणि गठ्ठे बनवणे, या सेवा करत असत. नंतर एक साधिका आणि मी ही सेवा करू लागलो. काही वेळा अंक मोजण्यात माझ्या चुका होत असत. त्या वेळी पू. आबा त्यासाठी मला कधी रागावल्याचे मला आठवत नाही. अंक मोजण्यात कधी अल्प-अधिक झाल्यास ते म्हणत, ‘‘परत मोजून पहा ! सापडेल.’’ त्यानंतर फरक सापडून सेवा वेळेत पूर्ण होत असे. त्या वेळी पू. आबा आमचे पुष्कळ कौतुक करायचे. तेव्हा मला ‘सेवा करतच रहावे’, असे वाटत असे. मला या सेवेतून इतके चैतन्य मिळत असे की, त्याच्या बळावर मी आठवडाभर साधना करू शकत असे.
४. पू. आबा म्हणजे सकारात्मकता, समाधान आणि आनंद यांचा झरा !
पू. आबा म्हणजे सकारात्मकता, समाधान आणि आनंद यांचा झराच आहेत. त्यांच्या सहवासात आलेली व्यक्ती सकारात्मक होते. पू. आबांचा आनंदी आणि समाधानी तोंडवळा पाहून आपणही आपल्या नकळत आनंदी आणि समाधानी होतो. ‘त्यांच्या वास्तव्याने मिरज आश्रमही आनंदी झाला आहे’, असे मला जाणवते.
५. साधकांना परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढवण्यास सांगणे
पू. आबा मिरज आश्रमातील आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना आधार देत. ते नकारात्मक स्थितीत असलेल्या साधकांना परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढवण्यास सांगून त्यांना आनंदी बनवत. मला काही वेळा निराशा आल्यास पू. आबांचे दर्शन आणि त्यांचे बोलणे, यांमुळे मला आलेली निराशा दूर होत असे.
६. व्यावहारिक गोष्टीही ऐकून घेऊन त्यावर सकारात्मकता आणि साधना यांचे उत्तर देणारे पू. आबा !
बरेच साधक त्यांना साधना करतांना येणार्या अडचणी पू. आबांकडे मांडत असत. पू. आबांनी साधकांना सकारात्मक बनवून बर्याच साधकांच्या साधनेतील व्यावहारिक अडचणींवर मात करण्यास शिकवले. मी ज्या वेळी व्यावहारिक अडचणी सांगत असे, त्या वेळी ते ‘सर्व व्यवस्थित होईल. गुरुदेवांचे लक्ष आहे. प्रार्थना करत जा’, असे सांगत. त्यामुळे मी सकारात्मक बनत असे. आश्रमात गेल्यामुळे मला सतत सकारात्मकतेचे आणि चैतन्याचे वातावरण मिळत असे. त्यामुळे माझा त्रास अल्प होऊन मला साधनेसाठी ऊर्जा मिळत असे.
७. पू. आबा यांच्यातील संतत्व साधिकेच्या यजमानांनाही जाणवणे
एकदा मी आणि माझे यजमान (श्री. श्रीकांत नीलकंठ बेलसरे) पू. आबांना भेटलो. त्या वेळी पू. आबांचा साधेपणा पाहून माझ्या यजमानांनाही वेगळे जाणवले आणि मला पू. आबांचा यजमानांवर प्रभाव पडल्याचे जाणवले. मी कधी मिरज आश्रमात जाणार असेन किंवा पू. आबांना भ्रमणभाष करणार असेन, तर माझे यजमान पू. आबांना नमस्कार सांगण्यास सांगतात.
८. पू. आबांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील कृतज्ञताभाव !
अ. पू. आबांच्या संतसन्मान सोहळ्याला मी उपस्थित होते. त्या वेळीही ते निरपेक्षभावात आणि कृतज्ञताभावात होते. ते संत झाल्यावरही त्यांच्या वागण्या-बोलण्यात वेगळेपणा नव्हता. ते म्हणतात, ‘‘परात्पर गुरुदेवांनी अजून काय द्यायला हवे ? त्यांनी सर्वकाही दिले आहे.’’
आ. परात्पर गुरुदेवांविषयी बोलतांना पू. आबांचा भाव जागृत होत असे. पू. आबा ‘परात्पर गुरुदेवांनी माझा हात हातात घेतला होता’, असे सांगत असतांना त्यांचे भावपूर्ण बोलणे ऐकून इतरांचीही भावजागृती होत असे.
९. परात्पर गुरुदेवांचे एक रूप असणारे पू. आबा !
पू. आबा परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच दिसत असल्याने ‘पू. आबा परात्पर गुरुदेवांचे एक रूप आहे’, असे साधकांना वाटते. पू. आबांशी बोलतांना ‘परात्पर गुरुदेवांशी बोलत आहोत’, असे साधकांना जाणवते.
१०. कृतज्ञता
‘परात्पर गुरुदेव, पू. आबांच्या माध्यमातून आपणच मला भरभरून चैतन्य दिले आहे. मिरज आश्रमात आपणच पू. आबांच्या माध्यमातून सर्व साधकांवर प्रीतीचा वर्षाव करत आहात. संतांचे श्रेष्ठत्व जाणण्यास मी अल्प पडत आहे. आपल्याच कृपेने मला संतसंग मिळाला आहे. त्यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. कविता बेलसरे, पुणे (२३.१०.२०२१)
|