शाळा आणि महाविद्यालये येथे जाऊन गड-किल्ल्यांची माहिती द्यावी ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोल्हापूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – युवासेनेच्या वतीने आयोजित केलेली गड-किल्ल्यांची स्पर्धा यापुढेही अखंडित ठेवावी. विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे जाऊन गड-किल्ल्यांची माहिती द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे आमदार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. युवासेना कोल्हापूर जिल्हा आणि कै. रामभाऊ चव्हाण दादा फाऊंडेशन यांच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम १८ नोव्हेंबर या दिवशी पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत १०० हून अधिक किल्ले बनवणारी मंडळे, विद्यार्थी, युवक यांनी सहभाग घेतला होता.

गडकिल्ल्यांच्या स्पर्धेत बक्षीस मिळालेल्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करतांना मंत्री श्री. उदय सामंत (मध्यभागी), मंजित माने (उजवीकडे) आणि अन्य

या स्पर्धेत ‘महाकाली भजनी मंडळा’ला प्रथम क्रमांक, ‘हिंदवी ग्रुप’ला द्वितीय क्रमांक, ‘देखो ग्रुप’ला तृतीय क्रमांक देण्यात आला, तसेच अन्य बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी मंजित माने यांनी केले. या प्रसंगी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.