ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची उत्तम शिष्या बनण्याचा ध्यास असलेली रामनाथी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला अमित औंधकर (वय १४ वर्षे) !

१.११.२०२१ या दिवशी कु. अपाला अमित औंधकर (वय १४ वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्ताने तिची आई सौ. दीपा औंधकर यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अपाला औंधकर
सौ. दीपा औंधकर

१. जन्मापासूनच अपालाचा आधार वाटणे

‘माझ्यात आणि अपालात केवळ आई अन् मुलीचे नाते नसून आध्यात्मिक नाते आहे’, असे मला वाटत आहे. मला तिच्या जन्मापासून तिचा नेहमी आधार वाटतो. अपालाचे आश्रमात होणारे कौतुक पाहून मला आनंद होतो आणि ‘तिला १४ वर्षे सांभाळण्यासाठी गुरुदेवांनी माझी निवड केली’, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

२. ‘सर्व देवाच्या नियोजनाप्रमाणे होते’, याची जाणीव होणे

‘अपाला ११ वर्षांची असल्यापासून घरी तिच्या खोलीत एकटी झोपायची. मला वाटायचे, ‘ती लहान आहे. तिने माझ्या समवेत झोपावे’; पण तिच्या या सवयीमुळे ती आश्रमात रहायला गेल्यावर तिला अडचण आली नाही. मी नसतांनाही ती आश्रमात राहू शकली. त्यामुळे ‘प्रत्येक गोष्ट देवाच्या नियोजनाप्रमाणेच होते’, असे मला वाटले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव

३ अ. लहान वयातच आश्रमजीवन स्वीकारणे : अपालाला घरी सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत. ‘ती जे म्हणेल आणि तिला जेव्हा जे हवे असेल, तेव्हा तिला ते आम्ही द्यायचो’, तरीही तिची केवळ गुरूंप्रती असलेली श्रद्धा अन् भाव, यांमुळे तिने इतक्या लहान वयात आश्रमजीवन स्वीकारले.

३ आ. अपालामध्ये पुष्कळ भाव आणि तळमळ आहे. ‘प्रत्येक क्षणी परात्पर गुरु डॉक्टर तिच्या समवेतच आहेत’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे. ‘तिच्या या श्रद्धेमुळेच मला अनेक प्रसंगांमध्ये बळ मिळत आहे’, असे मला वाटते.

३ इ. अपाला नेहमी म्हणते, ‘‘गुरुदेवांनी सांगायच्या आधीच त्यांच्या मनातील ओळखून त्यांना अपेक्षित अशी कृती करतो, तो उत्तम शिष्य ! मला गुरुदेवांची अशी उत्तम शिष्या बनायचे आहे.’’

‘हे गुरुदेवा, ‘अपाला आज जी काही आहे, ती केवळ तुमची कृपा आहे. तुम्हाला अपेक्षित असे वागण्यात मी पुष्कळ अल्प पडत आहे. तुम्हाला अपेक्षित असे आदर्श आई-वडील आम्हाला होता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. दीपा औंधकर (कु. अपालाची आई), रत्नागिरी (५.११.२०२१)

साहित्यिक प्रगल्भतेसह पद्यलेखनाचे विशेष कौशल्य असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील दैवी बालसाधक !

पू. तनुजा ठाकूर

१. दैवी बालकांनी उत्स्फूर्तपणे कविता करून त्यांचा गुरु आणि ईश्वर यांच्याप्रतीचा भाव व्यक्त करणे

‘दैवी बालक स्वतःचे विचार अत्यंत सहजतेने मांडतात आणि ते सत्संगात येण्यापूर्वीच चिंतन करून येतात. बहुतेक वेळा ते स्वतःची सूत्रे लिहून आणतात. ते सत्संगात शिकायला मिळालेल्या विषयांचे लेखनसुद्धा अत्यंत सुस्पष्टपणे करतात. सर्वांत आश्चर्याची गोष्ट ही आहे, ‘दैवी बालके उत्स्फूर्तपणे कविता करतात आणि त्या कविता त्यांच्या गूढ चिंतनाची प्रक्रिया, तसेच त्यांचा गुरु, ईश्वर अन् आश्रमातील प्रत्येक वस्तू यांच्या प्रती अप्रतिम भाव व्यक्त करतात. त्यांच्या कवितांमध्ये कधी गोपीभावही प्रतिबिंबित होतो, तर कधी ते सहजपणे ज्ञानमार्गाचे तत्त्व पद्यरूपात व्यक्त करतात.’

२. दैवी बालक कविता वाचून दाखवत असतांना संपूर्ण वातावरण चैतन्यदायी होण्यासह भावमय होणे

जेव्हा दैवी बालक स्वतः रचलेल्या कविता वाचून दाखवतात, तेव्हा संपूर्ण वातावरण चैतन्यदायी होण्यासह भावमय होऊन जाते. त्यांच्या गोड वाणीत कविता ऐकण्याचा आनंद विलक्षण असतो. तो शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. काही दैवी बालक, तर सत्संगात बसल्या बसल्याच कविता करतात. यावरून असे लक्षात येते, ‘साहित्यिक प्रगल्भतेसह त्यांच्यामध्ये विचार पद्यात व्यक्त करण्याचे कौशल्यसुद्धा आहे. एवढ्या लहान वयात केवळ ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्यामुळेच त्यांना हे शक्य होत आहे.’

– पू. तनुजा ठाकूर (१.११.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक