साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी योग्य प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

एका जिज्ञासूने विचारलेला प्रश्न :

पुत्ररत्न प्राप्त करणे आवश्यक आहे का ?

उत्तर : ‘जेव्हा कोणताही लिंगदेह मातेच्या गर्भात शरीर धारण करतो, तेव्हा सर्वप्रथम त्याला ‘जीव’ म्हणतात. त्यानंतरच त्याचे लिंग निश्चित होते आणि पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतरच त्याचे विविध संबंध बनतात; म्हणून जीवात्म्याची पहिली ओळख म्हणजे ‘मानव’ असणे आणि मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे आहे. ज्या व्यक्तीचे हे उद्दिष्ट असते, त्याच्यासाठी पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींना महत्त्व नसते, अन्यथा शुकदेव, आद्यगुरु शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी, संत ज्ञानेश्वर इत्यादी अनेक ब्रह्मचारी संन्यास घेऊन ईश्वरप्राप्तीकडे वळले असते का ?

पुत्राचे एक आध्यात्मिक कार्य आहे, ते म्हणजे पितृकर्म करून पित्याचा मृत्यूनंतरचा प्रवास सुलभ करणे; मात्र जर कुणी व्यक्ती साधना करून जीवन्मुक्त झाली, तर त्याला पुत्राची आवश्यकता काय आहे ? पुत्राचे लौकिक कार्य म्हणजे धर्मपालन करून आपल्या वडिलांच्या गुणसूत्रांचे रक्षण करत आपली कुळपरंपरा आणि वर्णधर्म यांचे रक्षण करणे; परंतु जर कुणाच्या प्रारब्धात कुपुत्र असेल किंवा अल्पायुषी पुत्र असेल, तर अशा पुत्राचा काय उपयोग ? म्हणून पुत्रप्राप्ती ही केवळ लौकिक दृष्टीने किंवा सृष्टीच्या सृजनप्रक्रियेसाठी आवश्यक आहे, म्हणून कुठल्याही साधकासाठी पुत्रप्राप्तीपेक्षा त्याने साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी योग्य प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे.’

– पू. तनुजा ठाकूर (११.११.२०२१)