संसदेत कायदे रहित होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – शेतकरी नेते राकेश टिकैत

‘भारतीय किसान युनियन’चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – तीन कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेले आमचे आंदोलन तात्काळ मागे घेतले जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू, जेव्हा कृषी कायदे संसदेत रहित केले जातील, अशी प्रतिक्रिया ‘भारतीय किसान युनियन’चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ट्वीट करून व्यक्त केली. ‘शेतमालाच्या किमान हमीभावावर अद्याप सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. सरकारने हमीभावासमवेत शेतकर्‍यांच्या इतर सूत्रांवरही चर्चा करावी’, असेही टिकैत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर देहलीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.

टिकैत पुढे म्हणाले, ‘‘माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यावर विश्‍वास नाही. पंतप्रधानांनी यापूर्वी प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये देण्याचेही आश्‍वासन दिले होते; पण आजपर्यंत किती जणांना १५ लाख रुपये मिळाले ? कायदे मागे घेणे, हा या आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी, श्रमिक आणि महिला यांचा विजय आहे.’’