माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना जामीन संमत !

अमरावती येथील हिंसाचार प्रकरण

 

माजी पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे (वरील छायाचित्रात)

अमरावती – अमरावती हिंसाचार प्रकरणी १७ नोव्हेंबर या दिवशी स्वतःहून अटक करून घेतलेले अमरावतीचे माजी पालकमंत्री, तसेच माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना १७ नोव्हेंबरच्या रात्री विलंबाने अमरावतीच्या न्यायालयाने जामीन संमत केला आहे. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना १५ सहस्र रुपयांच्या, तर जगदीश गुप्ता यांना ३० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे, तसेच दोघांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार १५ दिवस शहराबाहेर रहावे लागणार आहे. शहरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही भाजपच्या नेत्यांवर गुन्हे नोंद केले होते.

अमरावती येथील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट !

शहरातील हिंसाचारानंतर महाराष्ट्र ‘सायबर क्राईम’चे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाती आले आहेत; मात्र हे अहवाल धक्कादायक आहेत. ‘अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता’, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. ‘शहरात काही काळ संकेतस्थळ चालू केल्यानंतर ४ सहस्र आक्षेपार्ह ट्वीट्स झाले आहेत, असेही या अहवालात दिसून येत आहे’, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.