भिवंडी येथील संपादक किशोर पाटील पत्रकार क्षेत्रातील मानद ‘डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित !

ठाणे, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – लेखणीतून सामाजिक बांधिलकी जपत निःपक्षपाती राहून समाजबांधवांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देणारे, तसेच कोविडकाळात पत्रकारांना सहकार्य करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे पत्रकार किशोर पाटील यांना मानद ‘डॉक्टरेट’ मिळवण्याचा पहिला मान मिळाला.

त्यांना ‘महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ ओडिसा राज्य’ आणि ‘निती आयोग’ पुरस्कृत ‘कोरोनायोद्धा समाजसेवा रत्न’ पुरस्कार अन् मानद डॉक्टरेट पदवीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र्र राज्य आर्.एस्.पी.चे महासमादेशक डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह अन् प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. दैनिक ‘स्वराज्य तोरण’च्या १३ व्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे करण्यात आले.

भिवंडी तालुक्यातील कैलासनगर बेलपाडा या छोट्याश्या गावातील ह.भ.प. बळीराम पाटील आणि ह.भ.प. (सौ.) पार्वतीबाई पाटील या शेतकरी दांपत्याचे सुपुत्र किशोर पाटील हे मागील २७ वर्षे पत्रकारिता करत असून ते ‘स्वराज्य तोरण’ दैनिकाचे संपादक आहेत. ते महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृती धारक पत्रकार असून महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य आहेत. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस आणि शासकीय समित्यांवरही सदस्य आहेत.