औरंगजेबाने महाराष्ट्र्रातील गड आणि गावे यांची हिंदु नावे पालटून त्याठिकाणी मुसलमानी पद्धतीची नावे ठेवण्यामागचा दुष्ट हेतू !

औरंगजेब

‘औरंगजेब मराठ्यांचे गड व गावे घेऊनच थांबला नाही, तर त्याने त्यांची मूळची हिंदु नावे पूर्णपणे पालटून (बदलून) टाकली. त्या ठिकाणांना त्याने मुसलमानी पद्धतीची नावे दिली. त्याने परळीचा नौरसतारा, सातार्‍याचा अजीमतारा, पन्हाळ्याचा नबीशहादुर्ग, पावनगडचा बनीशाहदुर्ग, खेळण्याचा सखरलाना, सिंहगडचा बख्शिंदाबख्श, पुरंदरचा आजमगड, तोरण्याचा फत्-उल्-घलीब, रायगडचा इस्लामगड, वसंतगडचा किली-द-फतेह, पुण्याचे मुहियाबाद, खेडचे मुकसदाबाद, वाकिणखेड्याचे रहमानबख्शखेडा करून टाकले.

औरंगजेब हा पराकाष्ठेचा उद्योगी मनुष्य होता. ‘एका नावाच्या ठिकाणी दुसरे नाव ठेवणे, हा केवळ रिकामटेकडा उद्योग आहे’, असे त्याला वाटले असते, तर त्या कामात त्याने त्याचा बहुमोल वेळ मुळीच व्यय केला नसता. ‘नावात काय आहे’, असे शहाणे लोक म्हणोत; पण यापेक्षा ‘नावात काय नाही’, असेच विचारणे जास्त योग्य होईल. देश, गाव, नदी, माणूस आणि देव यांच्या नावात येथील संस्कृती, धर्म आणि अस्मिता यांचे सारसर्वस्व भरलेले आहे. औरंगजेबाला हे माहीत होते आणि (‘नावात काय आहे’, असे विचारणार्‍या) त्या तथाकथित शहाण्यांपेक्षा तो जास्त शहाणा होता; म्हणूनच वेळात वेळ काढून आणि बारीक विवरणात (तपशिलात) शिरून त्याने नावे पालटण्याचा खटाटोप या उद्देशाने केला की, हिंदुत्वाचे नावसुद्धा या भूमीत शिल्लक राहू नये. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या या स्वरूपाविषयी मराठ्यांना कसलाही भ्रम नव्हता.’

– प्रा. श.श्री. पुराणिक