काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या नैनीताल येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ

सलमान खुर्शिद यांच्या नैनिताल येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ

नैनीताल (उत्तराखंड) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. खुर्शिद यांनी त्यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या आतंकवादी संघटनांशी केली होती. त्यामुळे झालेल्या वादावरून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी शाहजहापूर येथे विश्‍व हिंदु परिषदेने सलमान खुर्शिद यांचा पुतळा जाळला होता, तसेच खुर्शिद यांची जीभ कापण्याची धमकीही दिली होती. ‘अशा लोकांना पाकिस्तानात पाठवायला हवे’, असेही विहिंपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले होते.

(म्हणे) ‘हिंदुत्व काय करते, हे पहायचे असेल, तर माझ्या घराचा जळालेला दरवाजा पहा !’ – सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया

  • खुर्शिद यांच्या घरावर आक्रमण करणारे हिंदुत्वनिष्ठ आहेत, असा निष्कर्ष खुर्शिद यांनी कसा काढला ?
  • पीडित हिंदूंची बाजू मांडणार्‍या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन आणि कुराणमधील आयतांवर प्रश्‍न निर्माण करणारे इंग्लंडमधील लेखक सलमान रश्दी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे कोण आहेत ?, हे खुर्शिद का सांगत नाही ?

(सौजन्य : Hindustan Times)

‘हिंदुत्व काय करते, हे पहायचे असेल, तर माझ्या घराचा जळालेला दरवाजा पहा, अशी प्रतिक्रिया सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या घरावरील आक्रमणानंतर व्यक्त केली.

‘पुस्तकातील उल्लेख चुकीचा वाटतो का ?’ असे खुर्शिद यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘अजिबात वाटत नाही अन्यथा मी पत्रकार परिषद बोलावली असती. जे माझ्या मताशी असहमत आहेत, त्यांनीही स्पष्ट सांगितलेले नाही. माझे नैनीतालमधील घर जाळण्यापर्यंत ते पोचले आहेत. यावरूनच मी जे सांगत आहे, ते सिद्ध होत नाही का ? त्यांचे हिंदुत्व विरोधाभास निर्माण करणारे आहे.’’