कालपटलावर शिवतेजाचा अमीट ठसा उमटवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

इतिहासप्रेमी, संशोधक, लेखक, संघटक, संयोजक, दिग्दर्शक, अभिनेता, गिर्यारोहक, कुशल वक्ता, अशा अंगभूत गुणांचे भांडार असणारे व्रतस्थ आणि ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांचा संगम असलेले कर्मयोगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाकडून श्रद्धांजली !

संकलक : श्री. भूषण कुलकर्णी, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, पुणे.

शिवशाहीर बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्याचा थोडक्यात परिचय !

स्वातंत्र्यसंग्रामात केलेले कार्य

  • वर्ष १९५४ मध्ये फ्रान्सिस मास्कारिन्हास यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांनी व्यापलेल्या दादरा, नगर हवेली या भागात स्वातंत्र्याच्या जयजयकारात भारतीय राष्ट्रध्वज फडकावला.
  • २ ऑगस्ट १९५४ या दिवशी सिल्व्हासा येथील कचेरीवरील पोर्तुगिजांचा ध्वज ११६ जणांच्या तुकडीने उतरवून तेथे आपला तिरंगा फडकावला. सुप्रसिद्ध संगीतकार कै. सुधीर (बाबूजी) फडके, पंढरपूर हिंदु सभेचे कै. वसंतराव बडवे यांच्यासह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यात प्रमुख भूमिका बजावली.

शिवशाहिरांची विपुल ग्रंथसंपदा

वर्ष १९५७ मध्ये त्यांनी ‘शिवचरित्र घरोघरी पोचावे’, हे ध्येय ठेवूनच अथक संशोधन आणि परिश्रम यांतून ‘राजा शिवछत्रपती’ हा १० खंडांचा ग्रंथ साकार केला. आतापर्यंत या खंडांच्या २० आवृत्त्या वितरित झाल्या आहेत. ‘गडसंच’ (गडविषयक), ‘पुरंदर्‍यांची दौलत’, ‘पुरंदर्‍यांची नौबत’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘मुजर्‍याचे मानकरी’ (ऐतिहासिक बखरीतील कथा), ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘शेलारखिंड’ (कादंबरी) ५० हून अधिक पुस्तकांद्वारे इतिहाससंशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

शिवछत्रपतींच्या चरित्राला उजाळा देण्यासाठी वेचलेले अनमोल क्षण !

  • भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करत असतांना इतिहास संशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले आणि तिथूनच इतिहास संशोधनाचा त्यांचा प्रवास चालू झाला.
  • २५ डिसेंबर १९५४ या दिवशी त्यांनी शिवचरित्रावरील पहिले सार्वजनिक व्याख्यान नागपूर येथे दिले. त्यानंतर वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत त्यांनी १२ सहस्रांहून अधिक व्याख्याने, प्रवचने यांद्वारे शिवचरित्र घराघरांत पोचवले !
  • वर्ष १९७४ या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्क येथे बाबासाहेबांनी शिवसृष्टी साकारली आणि त्याच वर्षी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्यासह ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनीफितीची निर्मिती केली.
  • त्यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात अखंडपणे शिवचरित्राची शाहिरी गाजवली.


जनतेकडून प्रेमाची ‘बाबासाहेब’, तर सातार्‍याच्या सुमित्राराजे भोसले यांच्याकडून ‘शिवशाहीर’ पदवी !

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे ! त्यांच्या आरंभीच्या पुस्तकांवर हेच नाव असे. पुढे पुढे जनतेने स्वतःहून अत्यंत प्रेमाने त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणून संबोधण्यास प्रारंभ केला. ‘शिवशाहीर’ ही पदवी सातार्‍याच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी प्रदान केली. जनतेकडून आणि शिवरायांच्या वंशजांकडून मिळालेल्या या उपाधींचा बाबासाहेबांना नेहमीच अभिमान वाटत असे. त्यांना याव्यतिरिक्त अनेक संस्थांकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत.


महानाट्य ‘जाणता राजा’ : नाट्यक्षेत्रातील दीपस्तंभ !

‘जाणता राजा’ महानाट्यातील शिवरायांच्या आगमनाचे दृश्य

बाबासाहेब इंग्लंडमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी पाहिलेले मोठमोठे पुतळे, प्रतिमा यावरून त्यांना नाट्यप्रयोगाची कल्पना सुचली. ते अमलात आणण्यासाठी एक कुशल संघटक म्हणून त्यांनी कामाला आरंभ केला. १४ एप्रिल १९८४ या दिवशी २५० कलाकार, तीन मजली रंगमंच, हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा वापर करून पूर्णतः ध्वनीमुद्रित केलेले ‘जाणता राजा’ हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे महानाट्य त्यांनी साकारले. तेव्हापासून या महानाट्याचे गेल्या ३ दशकांहून अधिक काळात देश-विदेशात सहस्रो प्रयोग झाले. छत्रपतींचे हे महानाट्य केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, इंग्रजी अशा ५ भाषांमधून जगभर पोचले.

‘जाणता राजा’ या महानाट्यात सर्वांना प्रवेश दिला जात असे. त्यांनी या महानाट्यासाठी ७ ते ८ सहस्र लोकांचे एक कुटुंब तयार केले. कलाकारांकडून कधी चुका झाल्या, तर चारचौघांत ओरडले नाहीत; पण ‘जाणूनबुजून केलेल्या चुकीला त्यांनी कधीच क्षमा केली नाही’, अशी शिस्तबद्ध शिकवण त्यांच्याकडून अनुभवायला मिळत असल्याचे कलाकार म्हणतात.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे तेजस्वी आणि परखड विचार !

  • इतिहास हा गुलाबाच्या पाण्याने नव्हे, तर रक्त आणि घाम यांच्या थेंबांनी निर्माण करावा लागतो !
  • इतिहास ही अत्यंत मौल्यवान अशी राष्ट्रीय संपत्ती आहे. आम्हाला अनेक राष्ट्रीय गुण आणि दुर्गुण यांचा इतिहासातून बोध होईल अन् त्यातून सुखी, समृद्ध, समर्थ, तसेच स्वाभिमानी राष्ट्र उभे करण्याचे शिक्षणही मिळेल !
  • शिवछत्रपतींचा इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकेच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे !
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मावळे जमा केले. कुणालाही आश्वासने दिली नव्हती. तरी ते निष्ठेने आणि प्राणपणाने लढले. आता देशभक्त माणसे शोधावी लागतात !
  • भारतियांनो, पहिल्यांदा तुमचे मन स्वदेशी करा, मग देश आपोआप स्वदेशी होईल !

बाबासाहेबांची ध्येयनिष्ठा !

गो.नी. दांडेकर एक विशेष आठवण सांगतांना म्हणाले, ‘‘महाबळेश्वर येथील बसस्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो. बाहेर धो-धो पाऊस चालू ! पाखरेही आडोसा धरून बसलेली. खिडकीतून आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो. इतक्यात एवढ्या जीवघेण्या पावसात सायकल चालवत चाललेला एकजण दिसला. विचारच करत होतो, इतक्यात चेहरा दिसला. तसाच धडपडत बसमधून खाली उतरलो. धावतच जाऊन त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले. विचारले, ‘‘हे काय ? या प्रलयपावसात कुठून आलास आणि कुठे निघालास ?’’ चिंब भिजलेला, काकडलेला तो तरुण म्हणाला, ‘‘आप्पा ! प्रतापगडावरून हडपांचा सांगावा आला, ‘शिवकालीन पत्र सापडलंय. लगेच या.’ निघालो. बससाठी पैसे नव्हते. सायकल मिळाली आणि निघालो पुण्यावरून !’’आप्पांनी त्या तरुणाला कडकडून मिठी मारली..कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यांतील पाणी थांबेना.. तो तरुण म्हणजे ‘बाबासाहेब पुरंदरे !’

– श्री. भूषण कुलकर्णी, प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’, पुणे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सनातनच्या ग्रंथांविषयी माहिती सांगतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०१२)

सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वर्ष २०१२ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांना सनातनच्या कार्याविषयी माहिती दिली होती. सनातनने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ बाबासाहेब पुरंदरे यांनी जिज्ञासेने पाहिले होते. या वेळी त्यांनी सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले.

‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनाही काही वेळा शिवशाहिरांची भेट घेण्याचा योग आला. त्यांनाही शिवशाहिरांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कधीही भेटायला यावे ! – बाबासाहेब पुरंदरे

हिंदु जनजागृती समिती आणि शिवशाहीर यांच्यातील जिव्हाळा !

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जुलै २०२१ मध्ये वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कृष्णाजी पाटील आणि पराग गोखले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. या वेळी बाबासाहेब पुरंदरे समितीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘पक्वान्न खाऊनही मला जेवढा आनंद मिळणार नाही, त्याहून अधिक आनंद तुम्हाला भेटून झाला. ईश्वराकडून मला ऋणानुबंध आणि प्रेम मिळाले. ते हृदयापर्यंत पोचले आणि हे प्रेम यापुढेही असेच राहील. तुम्ही कधीही मला भेटायला या, पुन:पुन्हा या !’

– श्री. कृष्णाजी पाटील, पुणे

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेले सन्मानपत्र !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत ! या दैवताची मूर्ती हिंदूंच्या मनात उभी करून तिचे पूजन करायला लावणारे अवलिया, शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार अन् या वयातही तसूभर न थकता शिवछत्रपतींचा महिमा गात मंत्रमुग्ध करणारे शिवशाहीर ! छत्रपती शिवरायांचा इतिहास हिंदु समाजाच्या हृदयावर ठसवण्याचे आणि शिवरायांची कीर्ती दिगंत करण्याचे आजवर कुणी केले नसेल, असे महान कार्य तुमच्या हातून आई तुळजाभवानीने करवून घेतले. त्यासाठी श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी कृतज्ञता आणि आई भवानीने तुमच्यावर कृपा करावी, असे विलक्षण कार्य तुम्ही केले, त्यासाठी तुमच्या चरणीही कृतज्ञता !

आपल्या सात्त्विक, सुमधूर वाणीतून; पण तितक्याच क्षात्रभावाने ओतप्रोत भरलेले शिवचरित्र कितीही वेळा ऐकले, तरी ते ऐकतच रहावेसे वाटते. युवकांना छत्रपती शिवरायांचे वेड लावायचे असेल, तर शिवचरित्र वाचायला द्यावे, असे ते आहे. हिंदु जनजागृती समिती तुमच्या अद्वितीय कार्याचा गौरव करते. ‘शिवचरित्रातून हिंदु युवा पिढीला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, अशी प्रार्थनाही करते. हिंदु जनजागृती समिती ईश्वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदूसंघटन यांद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध आहे. या कार्याला तुमचाही आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना !’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

(बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून हे सन्मानपत्र पुनर्प्रकाशित करत आहोत. – संपादक)

शिवशाहिरांच्या उत्तुंग कार्याची उपेक्षा करणारी सर्वपक्षीय सरकारे !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अनेक राजकारणी व्यक्तीगत स्तरावर आदरार्थी बोलत असले, तरी सरकारदरबारी त्यांच्या कार्याची उपेक्षाच केली गेली. वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्ष १९५४ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या सामाजिक कार्याला आरंभ झाला. ६ दशकांहून अधिक काळ सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या तपस्वी व्यक्तीला शासकीय पुरस्कारासाठी ६ दशके वाट पहावी लागली, हे लज्जास्पद आहे !

१. वर्ष १९९६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास आरंभ झाला. वर्ष १९५४ पासूनच सामाजिक कार्यात सक्रीय असणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अमूल्य माहिती संग्रहित करणार्‍या बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याची नोंद घ्यायला छत्रपतींच्याच राज्यात १९ वर्षे लागली, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे !

२. बाबासाहेबांना केंद्रशासनाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मिळण्यासाठी वर्ष २०१९ पर्यंत का वाट पहावी लागली ? त्यांच्या पूर्वी अंनिसचे हिंदु धर्मद्वेषी डॉ. नरेंद्र दाभोलकर, तसेच गुन्हे नोंद असलेला आणि काहीच कर्तृत्व नसलेला अभिनेता सैफ अली खान यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार दिला जातो, तर बाबासाहेबांना का नाही ? कारण ते ब्राह्मण आहेत म्हणून कि आणखी इतर कोणते राजकारण होते ? त्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घोषच केला, त्यावर संशोधन केले, हे सर्व संशोधन विज्ञानातील अनेक शोधांच्या कैकपटीने उत्तुंग आहे.

३. मध्यंतरीच्या काळात दादोजी कोंडदेव आणि जेम्स लेनच्या पुस्तकावरून धर्मद्रोही संघटनांकडून बाबासाहेबांना जिवे मारणे, कार्यक्रम उधळून लावणे यांसारख्या अनेक धमक्या देण्यात आल्या. या वेळी राज्य सरकारकडे ‘बाबासाहेबांना पोलीस संरक्षण द्यावे’ आणि ‘धर्मद्रोही संघटनांवर कारवाई करावी’, आदी मागण्याही करण्यात आल्या. त्या वेळी तत्कालीन काँग्रेस शासनाने बाबासाहेबांना संरक्षण पुरवले नाहीच आणि त्या संघटनांवर काही कारवाईही केली नाही.