कोणताही सारासार विचार न करता केवळ श्रेय मिळवण्यासाठी केलेला राजकीय पक्षांचा हा खटाटोप आहे का, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अवजड वाहनांची वाढती संख्या आणि तेथे होणार्या अपघातांची संख्या याच्या पार्श्वभूमीवर राजस सोसायटी चौक ते कोंढवा खडीमशीन हा साडेतीन किलोमीटर लांबीचा रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र रस्ता रुंदीकरणाच्या या प्रकल्पाला निधीचा फटका बसला आहे. मूळचा १५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असतांना भूसंपादनाच्या रोख मोबदल्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपये लागणार आहेत. प्रकल्प बाधितांनी महापालिकेकडे हस्तांतरण विकास हक्क (टी.डी.आर्.) किंवा चटई निर्देशांक (एफ्.एस्.आय.) ऐवजी रोख मोबदला मागितला आहे. त्यामुळे ही रक्कम कोठून आणायची ? असा प्रश्न पालिकेपुढे आहे. त्यामुळे रुंदीकरणाऐवजी केवळ डांबरीकरण करण्याचा निर्णय आता घेतला आहे.
रुंदीकरणाच्या प्रकल्पातील सल्लागार आस्थापनाने काम सोडल्यामुळे मूळ प्रकल्प बारगळल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील डिसेंबरमध्ये या कामाला प्रारंभ झाला होता. वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, तसेच प्रकल्पासाठी ८० टक्के भूसंपादन झाल्याविना कार्य आदेश (वर्क ऑर्डर) काढू नये, या आदेशाचेही पालन झाले नाही. रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ होऊन २० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या काही मासांपासून थांबली असल्याने केवळ ३ टप्प्यांत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सद्यस्थितीत ३९ कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा पथ विभागाने केला आहे.