पोलिसांनी भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना केले स्थानबद्ध !

अमरावती हिंसाचार प्रकरण

माजी कृषीमंत्री श्री. अनिल बोंडे

अमरावती – शहर ‘बंद’ला हिंसक वळण लागल्यानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच ‘नागरिकांनी घराबाहेर पडू नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील ३ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद असून १४ नोव्हेंबर या दिवशी शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी भाजपचे नेते तथा माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना शासकीय विश्रामगृह येथे स्थानबद्ध केले आहे. (जे दंगल घडवतात, अशा रझा अकादमीच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्याचे धाडस पोलीस दाखवतील का ? हिंदुत्वनिष्ठ नेते सहिष्णु असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर लगेच कारवाई करतात, हे सत्य आहे. – संपादक)  

भाजपच्या कार्यकर्त्यांनी १३ नोव्हेंबर या दिवशी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला होता. यामध्ये भाजपचे नेते तथा माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून म्हटले, ‘आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले, तर पोलीस-प्रशासन हे सरकार आणि नेते यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ याविषयी त्यांनी काही व्हिडिओ प्रसारित केले आहेत. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.