कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित !

२ वर्षांनंतर भरलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे भक्तांची मांदियाळी 

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोना संसर्गामुळे २ वर्षांनंतर भरलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. अनुमाने २ लाखांहून अधिक भाविक शहरात आले आहेत. भक्तिसागर ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, तसेच मठ, संस्थाने आदी भाविकांनी गजबजून गेले आहेत.

कार्तिकी यात्रेत भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी आरोग्ययंत्रणा सज्ज !

कार्तिकी यात्रेच्या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागातील अधीकारी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात येणारे भाविक आरोग्यदृष्ट्या निरोगी रहावेत, तसेच यात्रा कालावधीत येणार्‍या भाविकांना उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी लसीकरण केंद्रही उभी करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली. कार्तिकी यात्रेच्या कालावधीत भाविकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका, आरोग्य विभाग, तसेच जिल्हा परिषद तालुका आरोग्य विभाग या सर्वांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी, तसेच शहर परिसरातील ग्रामीण भागातही आरोग्ययंत्रणा उभी करण्यात आली आहे.