सावंतवाडी शहरातील २ वयोवृद्ध महिलांच्या हत्येच्या प्रकरणातील पसार झालेला संशयित पोलिसांच्या कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – शहरात झालेल्या २ वृद्ध महिलांच्या हत्येच्या प्रकरणात पसार झालेल्या एका संशयिताला पोलिसांनी ठाणे (मुंबई) येथून कह्यात घेतले आहे. यापूर्वी त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो वाचला. त्याच्या या कृत्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला असून पुढील चौकशीत त्याच्याकडून या प्रकरणाविषयी काही माहिती मिळते का ? याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

शहरातील उभाबाजार येथील नीलिमा नारायण खानविलकर (वय ८० वर्षे) आणि शालिनी शांताराम सावंत (वय ७५ वर्षे) या दोन महिलांची हत्या झाल्याचे ३१ ऑक्टोबरला सकाळी उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी १ नोव्हेंबरला काही संशयितांना कह्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले होते. या संशयितांपैकी एकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र वेळीच उपचार झाल्याने त्याची प्रकृती सुधारली होती. त्यानंतर तो युवक ९ नोव्हेंबरला सायंकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस त्या युवकाचा शोध घेत होते. त्याच्या भ्रमणभाषच्या ‘लोकेशन’वरून पोलिसांनी त्याला ठाणे येथून कह्यात घेऊन सावंतवाडी येथे आणले आहे.