सातारा, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – हुतात्मा सैनिक विशाल पवार हे जम्मू-काश्मीर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी ‘१६ मराठा लाईट इंन्फट्री’मध्ये हवालदार म्हणून कर्तव्य बजावत होते. १ वर्षापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उधमपूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. पुढे त्यांना देहली येथील सैनिकी रुग्णालयात भरती करण्यात आले. गत ३ मासांपासून त्यांच्यावर पुणे येथील कमांड सैनिकी रुग्णालयात उपचार चालू होते; मात्र ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. १० नोव्हेंबर या दिवशी वाठार (जिल्हा सातारा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यापार्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. हुतात्मा सैनिक विशाल पवार यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई-वडील, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.