सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – एस्.टी. कर्मचार्यांच्या राज्यव्यापी संपाला ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. या संपाला सातारा येथेही मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ११ आगारांतील एस्.टी. पुन्हा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळी संपवून कामावर रूजू होण्यासाठी जाणार्या नोकरदारांचे पुष्कळ हाल होत आहेत. या संपामुळे एस्.टी.च्या दिवसभरातील १ सहस्र २०० फेर्या रहित होऊन लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, मेढा, कोरेगाव या ११ आगारांतील एस्.टी. कर्मचार्यांनी ८ नोव्हेंबरपासून ‘कामबंद’ आंदोलन केले. एस्.टी. वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांना अधिकचे भाडे देऊन खासगी प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
सातारा विभागातील सर्व आगारांमध्ये चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाला येथील भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपचे सातारा शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक विकास गोसावी यांनी संप करणार्यांची घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
पुणे येथील स्वारगेट आणि शिवाजीनगर यांसह आणखी ३ डेपो बंद !
पुणे – एस्.टी. कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे येथील स्वारगेट आणि शिवाजीनगर यांसह ३ डेपोतील एस्.टी. सेवा ७ नोव्हेंबरपासून बंद झाली आहे. प्रतीवर्षी दिवाळीला कर्मचार्यांना १० सहस्र रुपयांची उचल मिळते; पण यंदा प्रशासनाकडून ती मिळाली नाही. ‘बोनस’च्या नावाखाली केवळ अडीच सहस्र रुपये देण्यात आले. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. स्वारगेट परिसरात कर्मचार्यांनी सकाळी अचानक संप पुकारल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना माघारी फिरावे लागले. स्वारगेट आगाराच्या आवारातच कर्मचारी एस्.टी. बस लावून संपात सहभागी झाले आहेत. शिवाजीनगर येथेही अशीच परिस्थिती आहे.