जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली मान्यता
पंढरपूर (सोलापूर) – कोरोनाच्या संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साधारण २० मासांनंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार आहे. १५ नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी आहे. कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून पंढरपूर येथे कोणतीही यात्रा भरली नव्हती. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या न्यून झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. ‘कार्तिकी यात्रा भरली जावी’, अशी मागणी अनेक वारकरी आणि महाराज मंडळी यांच्याकडून केली जात होती.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांचे दर्शन, कार्तिकी एकादशीची उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा, एकादशीचा श्री विठ्ठलाच्या रथयात्रेचा सोहळा, नेवैद्य, श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, पंढरपूरला येणार्या दिंड्यांचे नियोजन, मठांमध्ये उतरणार्या भाविकांची नियमावली, वाळवंटातील परंपरा यांसह अन्य सूत्रांविषयी सविस्तर आदेश काढला आहे.
श्री विठ्ठलाचे दर्शन २४ घंटे चालू रहाणार !
आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात पंढरपूर येथे येणार्या अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर २४ घंटे उघडे ठेवले जाते. या परंपरेनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला असून, श्री विठ्ठलाच्या पाठीशी ‘लोड’ ठेवण्यात आला आहे. यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून भाविक पंढरपुरात येण्यास प्रारंभ झाला असून यात्रेसाठी मंदिर समितीनेही सिद्धता केली आहे.