- ८५ टक्के असणारे मराठी फेरीवाले २०-२५ टक्केच राहिले !
- परप्रांतीय फेरीवाल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ !
उच्च शिक्षण, नोकरी, अधिक पैसा यांच्यासाठी स्वतःचा व्यवसाय परप्रांतियांच्या नियंत्रणात देण्याने मराठी अस्मिता कधीतरी जपली जाईल का ? अशाने मराठी बाणा तरी कसा टिकणार ? यापेक्षा स्वतःच्या उच्च शिक्षणाचा उपयोग धंदा, व्यवसाय यांमध्ये करून त्याचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न मराठीजनांनी करायला हवा, तरच मराठी संस्कृती टिकेल !
श्री. सचिन कौलकर, मुंबई.
मुंबई – दादर येथे मराठी फेरीवाल्यांची आकडेवारी २०-२५ टक्के इतकीच राहिली आहे. काही काळापूर्वी दादर परिसरात मराठी फेरीवालेच दिसायचे; पण आता सर्व व्यवसाय परप्रांतियांच्या हातात गेले आहेत. भाडेकरू फेरीवाल्यांमुळे परप्रांतियांची संख्या अधिक वाढलेली आहे.
१. दादरमध्ये पूर्वी मराठी फेरीवाल्यांविना अन्य कुणीही धंदा करू शकत नसे. बाहेरील व्यक्ती किंवा परप्रांतीय जर कुणी आला, तर त्याला तिथे व्यवसाय करण्याची अनमुती नसे, किंबहुना तशी हिंमत कुठलाही परप्रांतीय फेरीवाला करत नसे. आता तेथे मुंब्रा, दिवा, कल्याण, विरार, नालासोपारा, वांद्रे, मानखुर्द, गोवंडी आदी भागांमधून परप्रांतीय येऊन व्यवसाय करतात.
२. दादर येथील स्टार मॉल परिसरात पूर्वी एकही फेरीवाला नव्हता; पण आता तिथे २५-३० फेरीवाले आहेत. सेनापती बापट मार्गावर पूर्वी भाजीपाला, तसेच इतर माल घेऊन येणारे ट्रक रिकामे झाले की, ते निघून जायचे; परंतु आता या ट्रकला उभे करण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. एकेका ट्रककडून ३००-४०० रुपये घेतले जातात, अशी चर्चा आहे. अशा प्रकारे प्रतिदिन १०० हून अधिक टेम्पो आणि ट्रक येतात. ते सर्व ट्रक आणि टेम्पोमालक मराठी असून स्वतःच्या शेतातील माल घेऊन तो विकायला आणतात; पण त्यांनाच आता दादरमध्ये वाहने उभी करण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
३. निवृत्त पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास काश्यप म्हणाले, ‘‘मी वर्ष २००० मध्ये या विभागाचा पोलीस अधिकारी होतो. तेव्हा दादरमध्ये १५ टक्के परप्रांतीय आणि ८५ टक्के मराठी फेरीवाले होते; पण आज उलट स्थिती असून दादरमध्ये केवळ १० टक्के मराठी फेरीवाले उरले आहेत. आळस हाच मराठी माणसाचा प्रमुख शत्रू आहे. त्यांना कमाई न करता पैसे मिळत असल्याने ते परप्रांतियांना भाड्याने जागा देतात. मराठी फेरीवाल्यांची पहिली पिढी आता राहिलेली नाही. दुसरी पिढी सुशिक्षित आहे. त्यांना व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे त्यांनी जागा भाड्याने दिल्या आहेत आणि काहींनी विकल्या आहे.’’