रामनाथी आश्रमात रहाणारी दैवी बालसाधिका कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) याचीही आध्यात्मिक पातळी वाढून ती ६२ टक्के झाल्याचे घोषित !

श्रीहरि कृपेने कळी उमलूनी सायलीची, जाहले पुष्प सुंदर ।
निरंतर अनुसंधानात राही अनुज श्रीनिवास तिला साजेसा ।।

वार्ता दोघांच्या आध्यात्मिक उन्नतीची करे आम्हा आनंदमय ।
सद्गुरुकृपे स्थिरावले दोघे पावन अशा गुरुचरणकमली ।।

(रामनाथी आश्रमातील कु. प्राजक्ता धोतमल आणि श्री. सोहम् सिंगबाळ यांनी केलेल्या या काव्यातील ओळींची पहिली अक्षरे क्रमाने वाचली असता ‘श्रीनिवास’ हे नाव सिद्ध होते. काव्याच्या दुसर्‍या पंक्तीपासून शेवटची अक्षरे वाचल्यास ‘सायली’ हे नाव सिद्ध होते !)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. सायली रवींद्र देशपांडे हिचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे याचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – जन्मत:च उच्च आध्यात्मिक पातळी असलेली, सत्त्वगुणी दैवी बालके ही सनातनला लाभलेली अमूल्य भेट आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांना दैवी बालकांमधील दैवी गुण अनुभवायला मिळतात. कळी उमलून तिचे फूल होते आणि फुलाचा सुगंध सर्वत्र दरवळतो. नंतर ते फूल ईश्वरचरणी अर्पण होते. त्याप्रमाणे या दैवी बालकरूपी कळ्यांना परात्पर गुरुदेवच खुलवत आहेत. गुरुदेवांच्या कृपेने दैवी बालकांतील दैवी गुणांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला आहे. गुरुकार्यामध्ये सहयोग देऊन ही दैवी बालकरूपी फुले भगवंताच्या चरणी अर्पण होणार आहेत. आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीच्या शुभदिनी (२४ ऑक्टोबर) अशाच २ दैवी बालसाधकांच्या आध्यात्मिक उन्नतीची वार्ता देण्यात आली. मूळची यवतमाळ येथील आणि सध्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेली कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) ही दैवी बालसाधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली. तसेच तिचा लहान भाऊ कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) याचीही आध्यात्मिक पातळी १ टक्क्याने वाढून ती ६२ टक्के झाली. सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता दिली. या वेळी कु. सायली आणि कु. श्रीनिवास यांची आई श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे, आजी (आईची आई) श्रीमती मेघना वाघमारे आणि मामा श्री. धैवत वाघमारे हे उपस्थित होते. तसेच आश्रमातील अन्य दैवी बालसाधकही उपस्थित होते.


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी कु. सायली आणि कु. श्रीनिवास यांच्याविषयी सांगितलेली सामाईक सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘कु. सायली आणि कु. श्रीनिवास या दोघांवरही त्यांच्या आईने (श्रीमती धनश्री देशपांडे यांनी) चांगले संस्कार केले असल्याने दोघेही अल्प कालावधीत आश्रमजीवनाशी समरस झाले आहेत. दोघेही सतत भावावस्थेत असतात. दोघेही आश्रमातील दैवी वातावरणात साधनेत लवकर प्रगती करतील.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


कु. सायलीच्या अनुभूतीकथनानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अलगद उलगडले तिच्या प्रगतीचे गुपित !

सत्संगाच्या आरंभी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थित साधकांना वातावरणातील श्रीकृष्णतत्त्व अनुभवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘येथे श्रीकृष्ण आहे, असा केवळ भाव ठेवायचा नाही, तर तो प्रत्यक्ष येथेच आहे, या श्रद्धेने त्याचे अस्तित्व अनुभवूया.’’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या या एकाच वाक्यामुळे सत्संगात उपस्थित असलेला प्रत्येक साधक श्रीकृष्णाचे भावविश्व सहजतेने अनुभवू शकला. काही साधकांना वातावरणात मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. काही साधकांनी निरनिराळे दैवी गंध अनुभवले, तर काही साधकांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले. या वेळी कु. सायली देशपांडे हिने तिला आलेली अनुभूती सांगितली, ‘मला श्रीकृष्णाचा स्पर्श जाणवला.’ तिचे हे वाक्य ऐकताच उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी कु. सायलीला ‘तुला अन्य वेळीही अशा अनुभूती येतात का ?’, असे विचारल्यावर तिने यापूर्वी ध्यानमंदिरात नामजप करतांनाही अशा अनुभूती येत असल्याचे सांगितले.

कु. सायली देशपांडे

यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘स्पर्शाची अनुभूती येणे, ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे. एवढ्या लहान वयात अशा प्रकारे उच्च तत्त्वाची अनुभूती तिला आली. ही अनुभूती सांगतांनाही ती भावावस्थेत असल्याने उपस्थित साधकांचीही भावजागृती झाली. असा उच्च भाव असणार्‍या कु. सायलीने वयाच्या केवळ १२ व्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली आहे.’’ आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता ऐकून कु. सायलीची पुष्कळ भावजागृती झाली. सत्संग संपेपर्यंत ती अखंडपणे हात जोडून कृतज्ञताभावात होती. तिला अखंड भावाश्रू येत होते. ‘देव सतत माझ्यासमवेत असतो. तो मला कुणामध्ये अडकू देत नाही. कृतज्ञता !’, असे भावपूर्ण मनोगत तिने व्यक्त केले.

श्रीमती धनश्री देशपांडे

या वेळी कु. सायली आणि कु. श्रीनिवास यांची आई श्रीमती धनश्री देशपांडे, आजी (आईची आई) श्रीमती मेघना वाघमारे, आणि मामा श्री. धैवत वाघमारे यांनी कु. सायली आणि  कु. श्रीनिवास यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सत्संगात उलगडलेली कु. सायली हिची गुणवैशिष्ट्ये !

१. कठीण प्रसंगात आईला  धीर देणारी कु. सायली !

कु. सायली पुष्कळ प्रगल्भ आहे. काही मासांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. या कठीण परिस्थितीतही ती स्थिर राहिली. काही वेळा तिच्या आईला आधाराची आवश्यकता असल्यास कु. सायली आईला साधनेचे दृष्टीकोन देऊन धीर देते.

२. लहान असूनही सतत वर्तमानात रहाणारी कु. सायली !

कोणताही प्रसंग घडल्यास कु. सायली त्यामध्ये अडकत नाही. वर्तमानात राहून तिला लगेचच त्यातून बाहेर पडता येते. वर्तमानकाळात रहाणे मोठ्यांनाही जमत नाही; परंतु सायलीने ते सहज साध्य केले आहे. हा तिचा मोठा आध्यात्मिक गुण आहे.

३. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे

कु. सायलीच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा कु. सायलीला ‘आकाशात ॐ दिसणे, दैवी कण आढळणे यांसारख्या अनुभूती आल्या. कु. सायलीला आलेल्या अनुभूतींतून तिच्यामध्ये लहान वयात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे, हे लक्षात येते. देवतांचे अस्तित्व हे प्रत्येक साधकासमवेत असते; परंतु ते भावविश्व अनुभवणारे पुष्कळ अल्प जण असतात. कु. सायली देवाचे अस्तित्व अनुभवू शकते, यातूनच तिचे दैवीपण सिद्ध होते.

४. स्वत:ला पालटण्याची तळमळ, शिकण्याची वृत्ती असणे या गुणांमुळे कु. सायलीची आध्यात्मिक प्रगती जलद होईल !

कु. सायलीमध्ये विचारून करणे, स्वत:च्या चुका सहसाधकांना विचारणे, सेवा परिपूर्ण करण्याची अन् स्वत:ला पालटण्याची तळमळ असणे, शिकण्याची वृत्ती असणे आदी गुण आहेत. कु. सायलीने यापुढेही असेच प्रयत्न सातत्याने चालू ठेवल्यास तिची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद होईल !’’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


निर्मळ आणि भोळा भाव असलेला कु. श्रीनिवास !

कु. श्रीनिवास देशपांडे

‘कु. श्रीनिवास निर्मळ असून त्याच्यामध्ये भोळा भाव आहे. त्याच्यातील निर्मळता आणि भोळ्या भावामुळे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. त्याच्यामध्ये सहजता आणि अंतर्मुखता आहे.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


साधकांनी स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न  करतांना आनंदी आणि कृतज्ञताभावात रहावे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

१. स्वत:कडून होणार्‍या चुका नियमितपणे लिहिल्यास अंतर्मुखता येते !

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी स्वत:कडून झालेल्या चुका त्यांवरील योग्य दृष्टीकोन नियमित लिहिणे आवश्यक आहे. चुका आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोन नियमित लिहिल्याने स्वभावदोष दूर करण्याविषयी अंतर्मनातील जाणीव वाढून अंतर्मुखता येते. तसेच साधकाची अंतर्बाह्य शुद्धी होते. सारणीमध्ये चुका लिहिणे, हे एकप्रकारे ईश्वराला केलेले आत्मनिवेदनच आहे. आत्मनिवेदन केल्याविना दिवसभरातील साधनेला पूर्णत्व कसे येणार ? साधनेत साहाय्य होण्यासाठी आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रिण यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्यास सांगितले जाते. प्रत्येक वेळी आध्यात्मिक मित्र-मैत्रिणीचा वेळ कसा उपलब्ध होणार ? स्वभावदोष-अहंनिर्मूलनाची सारणी ही सर्व साधकांची पहिली आध्यात्मिक मैत्रिण आहे. त्यामुळे साधकांनी सारणीत चुका लिहिणे, स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचना सत्रे करणे, हे प्रयत्न मनापासून करायला हवेत.

२. चुकांचे लिखाण दिवसातून किती वेळा करावे ?

मनात अयोग्य विचार आल्यास किंवा स्वत:कडून अयोग्य कृती झाल्यास ती त्वरित सारणीमध्ये लिहून त्यावर योग्य विचार किंवा कृती काय असायला हवी ? हे लिहिणे, ही आदर्श पद्धत आहे. आश्रमांत रहाणारे साधक दिवसातून किमान १ घंट्याने सारणीत चुकांचे लिखाण सहजतेने करू शकतात. सेवा किंवा अन्य कामांमुळे असे शक्य नसल्यास दिवसातून किमान ३ वेळा तरी चुकांचे लिखाण करायला हवे.

३. काही साधकांना संतांचा सत्संग मिळतो. प्रत्येक साधकाला संतांचा सत्संग लाभला नाही, तरी ईश्वराचे तत्त्व सर्वांसाठी कार्यरत असते. साधकाच्या अंतरंगात भाव असला की, त्याच्यासाठी ईश्वराचे तत्त्व कार्यरत होते.

४. साधकांमध्ये स्वभावदोष असले, तरी ‘आपण गुरुदेवांच्या छत्रछायेखाली आहोत’, ही साधकांसाठी अत्यानंदाची गोष्ट आहे. त्यामुळे साधकांनी स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना आनंदी आणि कृतज्ञताभावात रहायला हवे. भगवंताचे भावविश्व अनुभवत स्वत:मध्ये गुरूंना अपेक्षित असे पालट करायला हवेत.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


एका साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीद्वारे सर्वांना दिव्य आनंद देणारे एकमेव मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !

जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, ही अत्यंत कठीण गोष्ट असली, तरी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधकांसाठी सहज शक्य होते. साधकांची प्रत्येक साधकाशी प्रत्यक्ष ओळख नसली, तरी परात्पर गुरुदेवांनी सनातनच्या साधकांना एकमेकांशी चैतन्याच्या धाग्याने जोडले आहे. हा सनातनचा दैवी परिवार आहे. या परिवारातील एखाद्या साधकाची पातळी ६१ टक्के होणे, म्हणजे त्या साधकाची ईश्वरप्राप्तीच्या दिशेने ६१ टक्के वाटचाल होणे. त्याची प्रगती हा इतर साधकांसाठीही अत्यंत आनंदाचा क्षण आहे. जगामध्ये असे दिव्य क्षण कुणी अनुभवत नाही. केवळ परात्पर गुरुदेवांसारखे महान आणि एकमेव गुरुच साधकांना असा आनंद देतात. असा दिव्य आनंद देणार्‍या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


दैवी बालसाधकांसाठी केलेले मार्गदर्शन

१. दैवी बालसाधकांनी सातत्याने साधनेचे प्रयत्न करायला हवेत !

दैवी बालसाधकांची आध्यात्मिक पातळी उपजतच उच्च असते; मात्र आध्यात्मिक पातळी उच्च आहे, म्हणून दैवी बालसाधकांनी निश्चिंत राहू नये. साधनेच्या प्रयत्नांमध्ये खंड पडल्यास साधनेत घसरण होऊ शकते. (पातळी अल्प होऊ शकते.) स्वतःच्या साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य रहाते ना ?

स्वत:चा वेळ वाया जात नाही ना ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन होण्यासठी गांभीर्याने प्रयत्न होतात ना ? हे दैवी बालसाधकांनी पहायला हवे. पातळीच्या अपेक्षेने नाही, तर ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने सातत्याने साधनेचे प्रयत्न करायला हवेत.

२. कुटुंबियांशी बोलतांनाही नम्रतेने बोलायला हवे !

काही दैवी बालसाधक साधकांसमवेत असतांना नम्रतेने बोलतात; मात्र कुटुंबियांसमवेत असतांना स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करत नाहीत. साधनेत असे वरवरचे प्रयत्न अपेक्षित नाहीत. साधकांसमोर निराळे आणि कुटुंबियांसमोर निराळे वागणे, याचा अर्थ योग्य कृती आणि विचार वृत्तीमध्ये न रुजणे. कुणाही समवेत असलो, तरी स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्न करत राहिल्यानेच आध्यात्मिक प्रगती होते. त्यामुळे कुटुंबियांशी बोलतांनाही ‘आपण साधकांशीच बोलत आहोत’, असा भाव ठेवून नम्रतेने बोलायला हवे.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

(कु. सायली देशपांडे आणि कु. श्रीनिवास देशपांडे यांच्याविषयीचे अन्य लिखाण वाचा उद्याच्या अंकात !)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक