एका बसस्थानकासाठी अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागणे, ही प्रशासनाची तीव्र असंवेदनशीलता !
‘श्रीसिद्धनाथाच्या नावाने चांगभलं’ या जयघोषाने दुमदुमणारी नगरी म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील ‘म्हसवड’ होय. आध्यात्मिक इतिहास असणारी म्हसवडनगरी मात्र प्रशासनाकडून उपेक्षित आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गत १२ वर्षांपासून रेंगाळत पडले आहे. याविषयी म्हसवड येथील लोकप्रतिनिधी आणि महामंडळाचे अधिकारी यांची प्रचंड उदासिनता लक्षात येते. त्याचाच घेतलेला हा आढावा !
१२ वर्षे होऊनही म्हसवड बसस्थानकाचे काम अपूर्णच !
राज्य परिवहन महामंडळाने १२ वर्षांपूर्वी म्हसवड (जिल्हा सातारा), तासगाव (जिल्हा सांगली) आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथील नवीन बसस्थानकाच्या बांधकामाच्या संदर्भात निविदा एकाच वेळी काढल्या होत्या. प्रथम तासगाव आणि नंतर लगेच शिर्डी येथील बसस्थानकाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण झाले; मात्र म्हसवड बसस्थानकाचे काम प्रारंभी ठेका कुणी घ्यायचा ?, या कारणावरून रखडले. पुढे अनेक अडचणी निर्माण होऊन कोरोना, दळणवळण बंदी आदी कारणांमुळे ते अजूनही अपूर्ण अवस्थेतच पडून आहे.
म्हसवड बसस्थानकाला ‘वाली’ कोण ?
११ सप्टेंबर २०१४ या दिवशी माण-खटावचे मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवीन बसस्थानकाच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ मोठा गाजावाजा करत उरकला; मात्र आता या घटनेला ७ वर्षे पूर्ण झाली, तरी पुन्हा त्याकडे कुणीही लोकप्रतिनिधी फिरकलेले नाहीत. नाशिक येथील एका ठेकेदाराने हे कंत्राट घेतले होते; पण याचे पुढे काय झाले ? बसस्थानकाचे काम कशामुळे अर्धवट राहिले ? पुढे कोण काम पूर्ण करणार आहे ? नवीन बसस्थानक कधी उपयोगात येणार ? याविषयी कुणालाच काहीच निश्चित माहिती नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर म्हसवड बसस्थानकाच्या कामाला गती येईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र ५ वर्षांहून अधिक काळ लोटला, अर्धवट राहिलेल्या बांधकामात एकही नवीन वीट लागलेली नाही. त्यामुळे म्हसवड बसस्थानकाला कुणी वाली आहे कि नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठेकेदाराचे कामाकडे दुर्लक्ष : बसस्थानकाचे काम ‘जैसे थे’च !
गतवर्षी मिरज येथील ठेकेदाराला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. जुन्या बसस्थानकाची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम चालू करण्यात आले; मात्र दळणवळण बंदीमुळे बसस्थानकाचे काम पुन्हा रेंगाळले. कोरोनाच्या काळातही काही नियम आणि अटी यांवर सरकारने बांधकामाच्या कामास अनुमती दिली होती; मात्र ठेकेदार या रेंगाळलेल्या कामाकडे फिरकलाच नाही. सध्या सरकारने दळणवळण बंदीमध्ये शिथिलता दिली असूनही म्हसवड बसस्थानकाचे काम ‘जैसे थे’च आहे.
श्रीसिद्धनाथाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या प्रचंड !
म्हसवड येथे श्रीसिद्धनाथाचे पुरातन मंदिर आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भक्त प्रतिवर्षी दर्शनासाठी येत असतात. येथील बसस्थानकातून भाग्यनगर, बीड, लातूर, धाराशिव, परळी-वैद्यनाथ, अक्कलकोट, तुळजापूर, महाबळेश्वर, कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि शहरे येथे नियमित प्रवासी वाहतूक चालू असते. यामुळे म्हसवड बसस्थानकातून ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
बसचालक, वाहक आणि प्रवासी यांची होणारी कुचंबणा !
म्हसवड बसस्थानकाचे नवीन बांधकाम रेंगाळल्यामुळे बसस्थानक परिसरामध्ये प्रवासी आणि मुक्कामी असणार्या गाड्यांची सुरक्षा अन् निवार्यासाठी जागाच उरलेली नाही. तसेच महिला आणि पुरुष प्रवासी, बसचालक आणि वाहक यांच्यासाठी प्रसाधनगृहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बसचालक, वाहक आणि प्रवासी यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
राजकीय इच्छाशक्ती हवी !
१२ वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असलेले म्हसवड बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, महामंडळाचे अधिकारी अन् कर्मचारी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तरच बसस्थानकाचे एक तप रेंगाळलेले काम लवकर पूर्ण होईल, हे निश्चित !
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा