क्षणिक सहवासातही उच्च स्तराच्या अनुभूती देणारे आणि साधकाचे खडतर प्रारब्ध क्षणार्धात नष्ट करणारे दिव्यावतारी गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. प्रकाश शिंदे यांना मुंबई येथील सेवाकेंद्रात वर्ष १९९० ते १९९९ या कालावधीत सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्यातील चैतन्यामुळे भूक लागल्याची जाणीव न होणे आणि त्यांच्या काही क्षणांच्या सहवासातच ‘देहबुद्धी नष्ट होणे, कालातीत होणे, चैतन्याच्या स्तरावर न थकता सेवा करणे’, अशा अनुभूती येणे

‘काही साधक नियमितपणे मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी जात असत. अनेक वेळा सेवा अधिक असल्याने परात्पर गुरु डॉक्टरही आमच्या समवेत सेवा करायचे. काही वेळा रात्रीचे दहा वाजून गेले, तरी सेवा संपलेली नसायची. अशा वेळी डॉ. (सौ.) कुंदाताईंना ‘आम्ही जेवलो नाही’, याची काळजी वाटायची. त्या परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणायच्या, ‘‘अहो मुलांना (साधकांना) भूक लागली असेल. त्यांना जेवून घेऊ दे आणि नंतर पुन्हा सेवा चालू करा.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सौ. कुंदाताईंना सांगायचे, ‘‘मी त्यांना कुठे अडवलय ? त्यांना भूक लागली असेल, तर ते जेवू शकतात.’’ परात्पर गुरु डॉक्टर जोपर्यंत आम्हाला ‘आता जेवून घ्या’, असे म्हणत नसत, तोपर्यंत आम्हाला भूक लागतच नसे. आम्ही सेवेशी एकरूप होत असू. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘‘झाले सर्व. आता जेवून घ्या !’’, असे सांगितल्यानंतरच आम्हाला भूक लागल्याची जाणीव व्हायची आणि मग आम्ही जेवायला जायचो. आम्ही जेवायला गेल्यानंतरही परात्पर गुरु डॉक्टर सेवा पुढे चालू ठेवून पूर्ण करत असत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्यातील चैतन्यामुळे आमची देहबुद्धी नष्ट होऊन आम्हाला वेळेचे भान नसायचे आणि भूक लागल्याची जाणीवही होत नसे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या काही क्षणांच्या सहवासात आम्हाला ‘देहबुद्धी नष्ट होणे, कालातीत होणे, चैतन्याच्या स्तरावर न थकता सेवा करता येणे’, या अनुभूती यायच्या. यातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगाचे महत्त्व लक्षात येते. आमची योग्यता नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला अशा उच्च स्तराच्या अनुभूती दिल्या, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. (वर्ष १९९२)

श्री. प्रकाश शिंदे

२. प्रथम भेटीतच साधकाच्या भावाचे प्रारब्ध सुसह्य करण्यासाठी प्रयत्नरत असणारे आणि त्याच्यावर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

२ अ. लहान भाऊ दिनेशला (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांकडे घेऊन जाणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिनेशला ऐकू येत नसल्याचे ओळखून त्याला आधुनिक वैद्यांकडे जायला सांगणे : मी उपचारांसाठी आणि सेवेसाठी नियमितपणे परात्पर गुरु डॉक्टरांकडे जात होतो. एकदा मी माझ्या समवेत माझ्या लहान भावाला (दिनेशला) प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीला घेऊन गेलो. ते बोलत असतांना ‘दिनेशला ऐकू येत नाही’, असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘याला ऐकू येत नाही का ?’’ मी ‘हो’ म्हटले. ते ऐकून परात्पर गुरु डॉक्टर गंभीर होऊन म्हणाले, ‘‘याला लवकरात लवकर आधुनिक वैद्यांना दाखव.’’ (वर्ष १९९०)

२ आ. आधुनिक वैद्यांनी ‘भावाच्या कानाची २ शस्त्रकर्मे करावी लागतील’, असे सांगितल्याने ताण येणे : दिनेशला आधुनिक वैद्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘याच्या कानाच्या मागील हाडे आणि कानाचा पडदा यांची हानी झाली आहे. त्यासाठी त्वरित शस्त्रकर्म करावे लागेल. प्रथम हाडे पालटावी लागतील आणि काही दिवसांनी कानाचा पडदा बसवावा लागेल. अशी २ शस्त्रकर्मे करावी लागतील. ती न केल्यास तो कुठेही मार्गात चक्कर येऊन पडू शकतो.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला ताण आला.

२ इ. परात्पर गुरुदेवांनी साधकाच्या भावाच्या शस्त्रकर्माविषयी प.पू. भक्तराज महाराज यांना विचारून घेणे आणि त्यांनी शस्त्रकर्म करण्याची अनुमती दिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना आनंद होणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या भावाच्या शस्त्रकर्माविषयी सांगितलेले मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. या प्रसंगाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आल्यावर ते म्हणाले, ‘‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) येणार आहेत. त्या वेळी आपण त्यांना विचारूया.’’ प.पू. बाबा सेवाकेंद्रात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टर स्वतः दिनेशला प.पू. बाबांसमोर घेऊन गेले आणि प.पू. बाबांना त्याच्या शस्त्रकर्माविषयी सांगून ‘ते करू का ?’, असे विचारले. प.पू. बाबांनी ‘शस्त्रकर्म करून टाका. काही त्रास होणार नाही’, असे सांगितले. ते ऐकून परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ‘ते दिनेशची कुठल्या तरी प्रारब्धातून सुटका करत आहेत’, असे मला जाणवले.

२ ई. दिनेशची शस्त्रकर्मे यशस्वी होणे

२ ई १. शस्त्रकर्मे यशस्वी झाल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘दोन्ही शस्त्रकर्मे एकाच वेळी करणे शक्य नसूनही कुणीतरी माझ्याकडून ती करवून घेतली आणि तुझ्या भावावर देवाची काहीतरी कृपा आहे’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांना दिनेशचे शस्त्रकर्म करण्यासाठी ३ – ४ घंटे लागले. शस्त्रकर्म करून आधुनिक वैद्य बाहेर आले. तेव्हा ते पुष्कळ आनंदी दिसत होते. त्यांनी सांगितले, ‘‘शस्त्रकर्मे यशस्वी झाली आहेत. दोन्ही शस्त्रकर्मे एकाच वेळी केली आहेत. माझ्या आतापर्यंतच्या वैद्यकीय व्यवसायात मी कधीही एकाच वेळी अशी दोन्ही शस्त्रकर्मे केली नाहीत आणि तसे होऊही शकत नाही.’’ मी त्यांचे आभार मानल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘ही शस्त्रकर्मे मी केलीच नाहीत. कुणीतरी माझ्याकडून ती करवून घेत होते. ‘मी दोन्ही शस्त्रकर्मे एकाचवेळी कशी केली ?’, ते माझे मलाच कळले नाही. ‘तुझ्या भावावर देवाची काहीतरी कृपा आहे’, याची मला जाणीव होत आहे. तुम्ही आताच पेढे घेऊन या आणि देवाजवळ ठेवा.’’

श्री. दिनेश शिंदे

२ ई २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच भावाची शस्त्रकर्मे यशस्वी झाली असूनही त्यांनी ‘सर्व देवाने केले’, असे सांगणे आणि त्यानंतर २ वर्षांनी दिनेश सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करण्यासाठी जाणे : मी आधुनिक वैद्यांचे बोलणे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सर्व देवाने केले.’’ प्रत्यक्ष त्यांनीच सर्व केले होते. ते जर ‘दिनेशच्या जीवनात आले नसते, तर काय घडले असते ?’, याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिनेशला त्याच्या प्रारब्धभोगाचा काहीही त्रास होऊ दिला नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिनेशला नवीन जीवन दिले आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर २ वर्षांनी दिनेश सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करण्यासाठी कायमचे रहायला गेला. (वर्ष १९९१) (तेव्हापासून आतापर्यंत तो आश्रमात सेवा करत आहे.)

३. समजून न घेता केलेल्या सेवेचा परिणाम परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकाच्या लक्षात आणून देणे

एकदा परात्पर गुरु डॉक्टर प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्‍याला जाऊन सेवाकेंद्रात आले. त्यांनी मला भंडार्‍याच्या प्रसादाचा पुडा त्याच इमारतीत रहाणार्‍या एका व्यक्तीला देण्यासाठी सांगितला. त्या दिवशी कामावर जाण्यासाठी मला उशीर झाला असल्याने मी घाईघाईत तो प्रसादाचा पुडा त्यांनी सांगितलेल्या घरात न देता दुसर्‍याच घरात दिला. मी प्रसादाचा पुडा ज्या व्यक्तीला दिला होता, त्या व्यक्तीने त्याच माळ्यावर रहाणार्‍या अन्य लोकांनाही ‘आज डॉक्टरजी ने हमें मिठाई दी ।’, असे सांगितले. तेव्हा काही जणांनी गुरुदेवांना विचारले, ‘‘तुम्ही त्यांना प्रसाद दिला. आम्हाला दिला नाही !’’ त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना त्या माळ्यावरील सर्व घरांमध्ये प्रसादाचे पुडे द्यावे लागले. नंतर त्यांना समजले, ‘मी जेथे प्रसाद द्यायला हवा होता, तेथे न देता अन्य घरात दिला होता. त्यामुळे हे सर्व घडले आहे.’ मी संध्याकाळी सेवेला गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तू प्रसादाचा पुडा भलत्याच घरात दिलास. तुझ्यामुळे मला आणखी मिठाईचे पुडे आणून द्यावे लागले. तुला समजले नाही, तर तू मला पुन्हा विचारायचे होतेस.’’ तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. माझ्यातील ‘उतावळेपणा आणि सेवा समजून न घेणे’, हे स्वभावदोष त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले.’

(वर्ष १९९४)

– श्री. प्रकाश शिंदे, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (३०.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक