उत्कट भाव, कुशाग्र बुद्धी आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्याने नवनवीन गोष्टी शिकून आनंदी रहाणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सान्वी धवस (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सान्वी धवस आणि चि. श्वेत बंगाळ हे दोघे आहेत !

मूळची ढवळी, फोंडा येथील रहाणारी आणि रामनाथी येथील अध्यात्म संशोधन केंद्रात राहून साधना करणारी कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी तिचा भाऊ श्री. अनिकेत धवस यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

कु. सान्वी धवस

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

१. इतरांशी मिळून-मिसळून रहाणे

‘कु. सान्वी बालसाधकांच्या समवेत मिळून-मिसळून रहाते. काही वेळा बालसाधकांमध्ये भांडणे अथवा वाद होतात; पण सान्वी त्यात सहभागी होत नाही. ती स्वतःच्या बोलण्याने अथवा कृतीने इतरांना कधीही दुखावत नाही.

२. स्थिर वृत्ती

सान्वीमध्ये भावनाशीलता अल्प असून ती पुष्कळ स्थिर असते. इतक्या वर्षांत मी तिला कधीही शाळेत जातांना, तसेच इतर ठिकाणी रडलेले अथवा निराश झालेले पाहिले नाही.

३. कुशाग्र बुद्धी असल्याने सान्वीने इंग्रजी आणि मराठी भाषांतील नवीन शब्दांचा वापर सहजतेने करणे

अगदी लहान असल्यापासून सान्वीचे शब्दकौशल्य चांगले असल्याने तिला उत्तम संभाषण करता येते. शाळेत एखादा नवीन शब्द शिकवल्यावर ‘तो कसा आणि केव्हा वापरायचा ?’, हे तिला व्यवस्थित कळते. काही वेळा बोलतांना ती इंग्रजी आणि मराठी भाषांतील नवीन शब्द वापरते. तिने वापरलेले हे नवे शब्द ऐकून मला आणि आई-बाबांना पुष्कळ आश्चर्य वाटते; कारण हे शब्द कठीण असतात. ‘अशा कठीण शब्दांचा वापर योग्य प्रकारे केव्हा आणि कधी करायचा’, हे तिला सहज समजते. यावरून ‘तिची बुद्धी कुशाग्र आहे’, हे लक्षात येते.

श्री. अनिकेत धवस

४. प्रांजळपणा आणि बोलका स्वभाव

सान्वीचा स्वभाव पुष्कळ बोलका आहे. घरी आल्यावर ती आम्हाला ‘शाळेत आणि आश्रमात काय काय घडले ?’, हे सविस्तर सांगते. सर्व प्रसंग ती अत्यंत प्रांजळपणे आणि आनंदाने सांगते. सान्वी आश्रमातील साधकांशीही सहजतेने बोलते. तिचे बोलणे ऐकून साधकांना तिचे विचार आणि ते व्यक्त करण्याचे शब्दकौशल्य पाहून पुष्कळ आश्चर्य वाटते.

५. अमेरिकेतून भारतात परतल्यावर शालेय वातावरणातील पालट सहजपणे स्वीकारणे

सान्वीचे बालवाडी ते पहिलीपर्यंतचे शिक्षण अमेरिकेत झाले आणि नंतर आम्ही भारतात वास्तव्याला आलो. इयत्ता २ री पासून ती गोव्यातील स्थानिक शाळेत जाऊ लागली. भारत आणि अमेरिका येथील शाळांमध्ये पुष्कळ भेद आहे. सान्वी आम्हाला तिला जाणवणारा हा फरक सांगत असे; मात्र तिने पहिल्याच वर्षी येथील शाळेतील वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतले. काही वेळा तिला येथील शाळेत जावेसे वाटायचे नाही; मात्र तिने शाळा कधी चुकवली नाही. नंतर ती शाळेत चांगली रुळली आणि तिला नवीन मैत्रीणीही मिळाल्या.

६. दळणवळण बंदीच्या काळात नवनवीन गोष्टी शिकून स्वतःला व्यस्त ठेवणारी कु. सान्वी !

सान्वीला इतर मुलांशी खेळायला आवडते; पण जेव्हा ती घरी एकटी असते, तेव्हा ती काही ना काही कृती करून स्वतःला व्यस्त ठेवते. दळणवळण बंदीच्या काळात सान्वी आणि माझे आई-वडील काही मास घरी होते अन् मी अध्यात्म संशोधन केंद्रात रहात होतो. त्या काळात सान्वी पुष्कळ नवीन गोष्टी शिकली. तिने कागद आणि पुठ्ठा वापरून काही वस्तू बनवल्या. घरात असलेल्या दोर्‍या वापरून दारात लावायला एक झोपाळाही बनवला.

७. दळणवळण बंदीचे वास्तव स्वीकारून आनंदाने रहाणे

दळणवळण बंदीच्या पहिल्या दोन मासांत सान्वी पुष्कळ कंटाळली आणि अध्यात्म संशोधन केंद्रात सेवेला जाण्याविषयी विचारू लागली. नंतर मात्र तिने याविषयी तक्रार केली नाही आणि स्वतःला व्यस्त करून घेतले. त्या वेळी माझ्या मनात ‘सान्वी पुष्कळ कंटाळली असेल. तिचे सर्व मित्र-मैत्रिणी येथे आश्रमात आहेत आणि ती एकटीच तिकडे आहे. त्यामुळे तिला खेळता येत नसेल’, असे विचार येत. मी तिच्याशी भ्रमणभाषद्वारे बोलायचो. त्या वेळी ‘ती आनंदात आहे’, असे मला जाणवायचे. तिच्याकडे मला सांगण्यासाठी पुष्कळ सूत्रे असायची. तेव्हा तिने ‘बंदीचे वास्तव आणि तिच्या कालावधीची अनिश्चितता स्वीकारली आहे’, हे माझ्या लक्षात आले. तिच्यातील स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे ती या काळात स्थिर आणि वर्तमानात राहू शकली.

परात्पर गुरु डॉक्टर, आपणच सान्वीची गुणवैशिष्ट्ये माझ्याकडून लिहून घेतलीत, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्याच कृपेने मला सान्वीसारखी दैवी बालिका बहीण म्हणून मिळाली. यासाठी मी कृतज्ञ आहे. ‘तिच्यात असणारे सर्व गुण माझ्या लक्षात येऊ देत आणि त्यातून मला शिकता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. अनिकेत धवस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२०)


प्रगल्भता असलेली आणि अंतर्मुख वृत्तीची कु. सान्वी धवस !

श्रीमती शिरीन चाइना

१. ‘कु. सान्वीचे विचार आणि आचरण यांमध्ये पुष्कळ प्रगल्भता जाणवते.

२. सान्वी पुष्कळ अंतर्मुख आणि विनम्र असून शांतपणे बोलते.

३. तिच्या वयाच्या अन्य बालसाधिकांच्या तुलनेत तिचा पोशाख साधा असतो.

४. तिला तिच्या भावाचा, श्री. अनिकेत धवस याचा पुष्कळ लळा आहे आणि त्याच्यावर विश्वासही आहे. मी तिला तिची आई (सौ. वैशाली धवस) आणि भाऊ यांच्यावर कधीही रुसतांना किंवा रागावतांना पाहिले नाही.

५. सान्वीचे हसणे मोहक आहे. ती सतत हसतमुख आणि ऐकण्याच्या स्थितीत असते.

६. सान्वीच्या डोळ्यांत पुष्कळ निरागसपणा आणि भाव आहे.’

– श्रीमती शिरीन चाइना, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता