विविध ठिकाणी होणारी भेसळ रोखण्यासाठी चाचणी प्रयोगशाळांची आवश्यकता आहेच. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही पुरेशा प्रमाणात भेसळ ओळखण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा नसणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे. प्रयोगशाळांच्या अभावी भेसळीचे नमुने वेळेत पडताळता येत नाहीत आणि त्यातूनच आरोपींची सुटका होते. हे रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात चाचणी प्रयोगशाळा उभी करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक
संभाजीनगर – मिठाई, दूध, खवा यांसह अन्नपदार्थांत होणार्या भेसळीचे नमुने पडताळणीसाठी राज्यातील राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात; मात्र राज्यात केवळ ३ राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रयोगशाळा असल्याने कारवाईतून जमा केलेले सहस्रो नमुने ६ मासांहून अधिक काळापर्यंतही पडताळले जात नाहीत. संभाजीनगर विभागातील ३ सहस्र ५०० नमुने अजून पडताळणे बाकी आहेत. या समस्येमुळे केलेली कारवाई न्यायालयात वैध ठरवतांना पुष्कळ अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी माहिती अन्न आणि औषधमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले…
१. दीपावलीपूर्वी अन्न आणि औषध विभागाकडून खवा अन् मिठाई यांतील भेसळ पडताळणीसाठीची कारवाई चालू आहे. ‘भेसळ होत असेल, तर कारवायांची संख्या वाढवा’, असे आदेश नव्याने दिले आहेत. अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहोत; पण प्रयोगशाळा अल्प आहेत, तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या अल्प आहे.
२. आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे पदे भरण्यासंबंधीची माहिती कळवण्यात आली आहे; पण राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून मान्य केलेल्या चाचणी प्रयोगशाळा अल्प आहेत.
३. सध्या मुंबई, पुणे आणि नागपूर येथे प्रयोगशाळा चालू आहेत. नाशिक आणि अमरावती येथे प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत. संभाजीनगर येथील प्रयोगशाळेस अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्रुटी दूर करून पुन्हा मान्यता मिळावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
४. राज्यात प्रतिबंधित पदार्थ विक्रीवरील कारवायाही वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याची उद्दिष्टेही ठरवून देण्यात आली आहेत. येत्या काळात प्राणवायूची न्यूनता भासू नये, यासाठी त्याचीही क्षमता वाढवण्यात आली आहे. सध्या प्राणवायू प्रकल्पाची आवश्यकता फारशी नसल्याने विजेवर चालणारे काही प्रकल्प बंद आहेत; पण प्राणवायू प्रकल्पाची क्षमता आता वाढली आहे.